Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

रामटेकची जागा शिवसेना राखणार का?

रामटेक... पौराणिक आणि राजकीय महत्त्व असलेला नागपूर जिल्ह्यातला मतदारसंघ... १४ वर्षांच्या वनवासात असताना प्रभू श्रीरामचंद्र रामटेकला आश्रयाला असल्याची आख्यायिका आहे. 

रामटेकची जागा शिवसेना राखणार का?

अमर काणे,  झी मिडिया, रामटेक : रामटेक... पौराणिक आणि राजकीय महत्त्व असलेला नागपूर जिल्ह्यातला मतदारसंघ... १४ वर्षांच्या वनवासात असताना प्रभू श्रीरामचंद्र रामटेकला आश्रयाला असल्याची आख्यायिका आहे. 'मेघदुतम'सारख्या विश्व-विख्यात अजरामर काव्याची रचना कवी श्रेष्ठ कालिदासांनी याच रामटेकला रचली... अतिशय निसर्गसंपन्न असलेला हा मतदारसंघ क्षेत्रफळाच्या दृष्टीनं बराच पसरलेला.. मोठ्या संख्येनं दलित आणि मुस्लिम मतदारांचा समावेश इथं आहे. इथल्या खाणींमुळे परप्रांतीयांची संख्या देखील लक्षणीय आहे. रामटेक लोकसभा मतदारसंघात १८ लाख ४१ हजार ७३४ मतदार आहेत. यापैकी ९ लाख ६३ हजार २५९ पुरुष आणि ८ लाख ७८ हजार ४५० महिला  मतदार आहेत.

मध्य प्रदेशच्या सीमेला लागून असलेल्या रामटेकमधील बहुतांश भाग ग्रामीण लोकवस्तीचा आहे. एकेकाळी काँग्रेसची मजबूत पकड असलेल्या या मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांनी सलग दोनदा केलं.

 

१९८४ आणि १९८९ मध्ये नरसिंह राव रामटेकमधून निवडून आले. १९७७ पासून १९९८ पर्यंत जतीराम बर्वे, नागपूरचे राजे तेजसिंगराव भोसले, दत्ता मेघे, राणी चित्रलेखा भोसले हे काँग्रेसचे खासदार होते. १९९९ आणि २००४ मध्ये शिवसेनेचे सुबोध मोहिते रामटेकमधून विजयी झाले. सुबोध मोहिते काँग्रेसमध्ये गेल्यानंतर २००७ मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या प्रकाश जाधवांनी त्यांना पराभवाची धूळ चारली. २००९ मध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मुकुल वासनिक इथून निवडून आले. २०१४ मध्ये रामटेकच्या गडावर पुन्हा एकदा शिवसेनेचा भगवा फडकला. शिवसेनेच्या कृपाल तुमानेंनी मुकुल वासनिक यांचा दणदणीत पराभव केला. तुमाने यांना ५ लाख १९ हजार ८९२ मतं मिळाली. तर वासनिकांना ३ लाख ४४ हजार १०१ मतं मिळाली....

रामटेकमध्ये शिवसेनेचा खासदार असला तरी विधानसभेच्या ६ पैकी ५ मतदारसंघात भाजपचे आमदार निवडून आले, तर एक जागा काँग्रेसनं जिंकलीय. कामठीमधून चंद्रशेखर बावनकुळे, उमरेडमधून सुधीर पारवे, हिंगणामधून समीर मेघे, रामटेकमधून मल्लिकार्जुन रेड्डी आणि काटोलमधून आशिष देशमुख असे भाजपचे पाच आमदार आहेत तर सावनेरमधून काँग्रेसचे सुनील केदार आमदार आहेत. आगामी निवडणुकांमध्ये भाजपसोबत युती न करण्याची घोषणा शिवसनेने केलीय.त्यामुळं सध्याचं राजकीय बलाबल पाहता रामटेकची जागा राखणं शिवसेनेला अवघड होणाराय, यात शंकाच नाही.

 

Read More