Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

पराभूत होऊनही पंकजा मुंडे यांना थेट आमदार का बनवणार ? भाजपचा आजपर्यंताचा सर्वात मोठा राजकीय प्लान

पंकजा मुंडेंचं लवकरच विधिमंडळात 'कम बॅक' होणार आहे. पराभव होऊनही भाजपने पंकजा मुंडे यांना संधी का दिली जाणून घेऊया. 

पराभूत होऊनही पंकजा मुंडे यांना थेट आमदार का बनवणार ? भाजपचा आजपर्यंताचा सर्वात मोठा राजकीय प्लान
Updated: Jul 01, 2024, 08:17 PM IST

Pankaja Munde : भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde :) पुन्हा एकदा कम बॅक करण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. आगामी विधानपरिषद निवडणुकीसाठी भाजपच्या वतीनं 5 उमेदवारांची घोषणा करण्यात आली. त्यापैकी एक नाव आहे पंकजा मुंडे यांचे आहे. पंकजा मुंडे यांना ही संधी का मिळाली. काय आहे भाजपचा राजकीय प्लान जाणून घेऊया. 

देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये पंकजा मुंडे महिला आणि बालविकास मंत्री होत्या. परळी विधानसभा निवडणुकीत धनंजय मुंडेंनी त्यांना पराभव केला. यानंतर लोकसभा निवडणुकीत बहिण प्रीतम यांच्याऐवजी पंकजा मुंडे यांना उमेदवारी देण्यात आली.  विधानसभेपाठोपाठ लोकसभा निवडणुकीतही पंकजा मुंडेंना दारूण पराभव पत्करावा लागला. शरद पवार गटाचे उमेदवार बजरंग सोनावणेंनी पंकजा मुंडे यांचा दारूण पराभव केला. 

पंकजा मुंडेंना विधानपरिषदेवर आमदार करून त्यांचं राजकीय पुनर्वसन करण्याचा प्लॅन

मात्र आता पंकजा मुंडे समर्थकांसाठी भाजपच्या गोटातून आनंदाची बातमी जाहीर झाली आहे. भाजपनं विधानपरिषदेच्या 5 उमेदवारांची घोषणा सोमवारी केली, त्यामध्ये एक नाव आहे पंकजा मुंडे. पंकजा मुंडेंना विधानपरिषदेवर आमदार करून त्यांचं राजकीय पुनर्वसन करण्याचा प्लॅन भाजपनं आखलाय.. आगामी विधानसभा निवडणुकीआधी ओबीसी मतांची बेगमी करण्यासाठी भाजपनं खास ओबीसी कार्ड बाहेर काढलंय..

भाजपचं 'ओबीसी-दलित-मराठा कार्ड'

पंकजा मुंडे यांच्या रुपानं ओबीसीतील वंजारी समाजाला पुन्हा संधी देण्यात आली आहे.  योगेश टिळेकर यांच्या रुपानं ओबीसीतील माळी समाजाचा चेहरा भाजपनं दिला आहे.  डॉ. परिणय फुके विदर्भातील कुणबी समाजाचं प्रतिनिधीत्व करतात. ओबीसी आंदोलनात ते अग्रेसर आहेत. अमित गोरखे हे अनुसूचित जातीतील आहेत. लोकसभेतील दलित समाजाचा रोष कमी करण्यासाठी त्यांनी संधी देण्यात आलीय. तर सदाभाऊ खोत यांच्या रूपानं मराठा समाजालाही भाजपनं प्रतिनिधीत्व दिलंय. शेतकरी आंदोलनातील ते प्रमुख नेते आहेत. यापैकी 3 उमेदवार पश्चिम महाराष्ट्रातील, तर मराठवाडा, विदर्भातील प्रत्येकी 1 उमेदवार आहे

येत्या 12 जुलैला विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी होणा-या निवडणुकीत भाजप 5 जागा लढवणार आहे. ज्या  पाच जणांना भाजपनं उमेदवारी दिलीय, त्यापैकी चौघेजण मूळचे भाजप कार्यकर्ते आहेत. भाजपामध्ये बाहेरून आलेल्यांना संधी दिली जाते आणि मूळ कार्यकर्त्यांवर अन्याय होतो, अशी दबक्या आवाजात चर्चा आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजपनं विधानपरिषदेचे उमेदवार ठरवताना पुरेशी काळजी घेतल्याचं चित्र दिसतंय..