Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

अकोले मतदारसंघात राष्ट्रवादी पिचडांवर मात करणार का?

पिचड भाजपमध्ये गेल्याने राष्ट्रवादीचं भाजपच्या झेडपी सदस्याला तिकीट

अकोले मतदारसंघात राष्ट्रवादी पिचडांवर मात करणार का?

प्रशांत शर्मा, झी मीडिया, अकोले : राज्यातील एक चर्चित विधानसभा मतदारसंघ असलेल्या अकोले येथे राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेले वैभव पिचड आणि किरण लहामटे आमने-सामने आहेत. पिचड आपलं वर्चस्व कायम ठेवतात की राष्ट्रवादी पिचडांवर मात करते ते पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. 

अकोले विधानसभा मतदारसंघात गेली ३५ वर्षे मधुकर पिचडांचं वर्चस्व आहे. मात्र ऐन विधानसभा निवडणुकीआधी पिचड पिता-पुत्रांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे अकोले तालुक्यातली राजकीय समीकरणं बदलली आहेत. वैभव पिचड भाजपचे उमेदवार आहेत. विकासाच्या मुद्यावर ते मतं मागत आहेत.

अकोले तालुक्यातल्या सर्वपक्षीय पिचड विरोधकांची मोट बांधत राष्ट्रवादीनं भाजपचेच झेडपी सदस्य डॉक्टर किरण लहामटेंना उमेदवारी दिली. चौकशीच्या फेऱ्यात अडकू नये. यासाठी पिचड भाजपमध्ये गेल्याचा आरोप लहामटेंनी केला आहे.

पिचड पिता-पुत्रांनी पक्ष सोडल्यानंतर तालुक्यात राष्ट्रवादी संपली की काय अशी स्थिती होती. मात्र अजित पवार आणि शरद पवारांनी सभा घेत राष्ट्रवादीची ताकद दाखवत निवडणुकीत रंगत आणली आहे.

अकोले विधानसभा मतदारसंघात मतं विभाजन टाळून पिचडांचा पराभव करण्याचा चंग राष्ट्रवादीनी बांधला आहे. मात्र याठिकाणी पिचड पुन्हा बाजी मारतात की राष्ट्रवादी विजयश्री खेचून आणते हे निकालानंतरच स्पष्ट होईल.

Read More