Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

'टॉमी'च्या निधनानंतर कुटुंब बुडाले शोकसागरात, केले अंत्यसंस्कार

माणूस आणि पाळीव प्राणी यांचे ऋणानुबंध किती घट्ट असतात याचा प्रत्यय गुरुवारी माणगावात आला.  

'टॉमी'च्या निधनानंतर कुटुंब बुडाले शोकसागरात, केले अंत्यसंस्कार

प्रफुल्ल पवार / अलिबाग : माणूस आणि पाळीव प्राणी यांचे ऋणानुबंध किती घट्ट असतात याचा प्रत्यय गुरुवारी माणगावात आला. कुत्रा हा माणसाचा सर्वात जवळचा आणि इमानदार मित्र. त्यामुळे मालक आणि त्याची मैत्री खूपच घनिष्ट असते. हा जिव्हाळा त्याच्या मरणानंतरही कमी होत नाही. रायगड (Raigad) जिल्ह्यातील माणगाव (Mangoan) तालुक्यातील उतखोल इथल्या अनंता थळकर यांच्या कुटुंबीयांनी तब्बल १२ वर्षे जीवापाड जपलेल्या टॉमी (Tommy Dog) नामक कुत्र्याचे काल निधन (Dog Death) झाले आणि अवघं कुटुंब शोकसागरात बुडाले. 

आपल्या घरातील एक सदस्य गमावल्याचे दुःख या कुटुंबाने अनुभवले. माणसाप्रमाणे सर्व विधी करून त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. 'टॉमी'ला हळद कुंकू हार, फुलं वाहून त्याची पूजा करण्यात आली. त्यानंतर कफनात गुंडाळून त्याला पुरण्यात आले. ज्या ठिकाणी या कुत्र्याला दफन करण्यात आले तिथे एक रोप लावून 'टॉमी'च्या आठवणी जपण्याचा संकल्प थळकर कुटुंबाने सोडला आहे. 

एकीकडे आपल्याच वृद्ध आईवडिलांना रस्त्यावर सोडून देणारी मुलं आहेत तर दुसरीकडे मुक्या प्राण्यावर मेल्यावरदेखील प्रेम करून माणुसकीचे दर्शन घडवणारी थळकर कुटुंबासारखी माणसं देखील आहेत. मागील काही दिवसांपासून टॉमी आजारी होता. ९ दिवस त्याने अन्नाचा कण देखील खाल्ला नव्हता. पशुवैद्यकाकडे घेऊन गेले त्याने उपचार केले परंतु त्याचा काहीच उपयोग झाला नाही. 

अखेर गुरुवारी 'टॉमी'ने प्राण सोडला आणि थळकर कुटुंबाला अश्रू अनावर झाले. 'टॉमी'बरोबरच लहानाचा मोठा झालेला थळकर यांचा १२ वर्षांचा मुलगा साईराज हादेखील टॉमीकडे पहात हुंदके देत रडत होता. परिसरात 'टॉमी'चा दरारा होता पण अनेकांशी त्याची दोस्ती होती. पर्यावरणप्रेमी शंतनू कुवेसकर यांच्याशी त्याची चांगलीच गट्टी जमली होती.

Read More