Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

महाराष्ट्रात सुरु केलेली दारुविक्री ही घातक - चंद्रकांत पाटील

मुंबई, पुणे हॉटस्पॉट असताना दारु दुकाने उघडी न ठेवण्याची मागणी

महाराष्ट्रात सुरु केलेली दारुविक्री ही घातक - चंद्रकांत पाटील

पुणे : 'केवळ पुण्यात नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रात सुरु केलेली दारुविक्री ही घातक आहे. नागरिकांनी रस्त्यावर मोठया रांगा लावल्या आहेत. सोशल डिस्टन्सिंग अजिबात पाळले जात नाही. सगळेजण घरामध्ये एकत्र असल्याने यापूर्वीच अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यात दारुच्या बाटल्या घरात आल्या की आणखी अडचणी निर्माण होत आहेत. दारु विक्रीतून मिळणारे उत्पन्न वगैरे गोष्टी बाजूला ठेऊन सामाजिक अडचणी लक्षात घेता, हे बंद करायला हवे. दारु ही जीवनावश्यक गोष्ट नाही. त्यामुळे मुंबई, पुणे हॉटस्पॉट असताना या शहरांसह संपूर्ण महाराष्ट्रात दारुची दुकाने उघडी ठेऊ नये,' अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

पुणे महापालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांच्या वतीने आज गरजूंना अन्न धान्याच्या किटचं वाटप करण्यात आलं. भारतीय जनता पक्षाने शहरात सुमारे 2 लाखांपेक्षा जास्त गरजूंना मदत पोहोचवली असल्याचं यावेळी चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं.

लॉकडाऊनमध्ये दारू खरेदीसाठी लोकांची होणारी गर्दी, त्यातून लॉकडाऊनच्या नियमांचे होणारे उल्लंघन लक्षात घेता मंगळवारी मुंबई महापालिकेने लॉकडाऊनमध्ये दिलेली शिथिलता रद्द केली. लॉकडाऊनमध्ये राज्य सरकारने शिथिलता दिली होती. त्यानुसार अत्यावश्यक सेवेच्या दुकानांव्यतिरिक्त इतर दुकानं सुरू करण्याची परवानगी सरकारने दिली होती. ज्यामध्ये दारूच्या दुकानांनाही परवानगी देण्यात आली होती. मात्र दारू खरेदी करण्यासाठी मुंबईत अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचं दोन दिवस पहायला मिळालं. अनेक ठिकाणी काही किलोमीटरची रांग लागली होती. 

राज्यात यावेळी दारु खरेदीसाठी कोणत्याही नियमांचं पालन होतांना दिसत नाहीये. दारू खरेदी करण्यासाठी लोक अक्षरशः एकमेकांवर अनेक ठिकाणी तूटन पडलेले पहायला मिळाले. दुकानांसमोर ग्राहकांनी गर्दी केल्याचं दिसून आलं. यातून कोरोनाचा फैलावच होण्याची भीती आणखी वाढली आहे.

Read More