Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

काजोलचे काय चुकले? मोदींच्या शिक्षणाचा उल्लेख करत ठाकरे गटाचा सवाल; म्हणाले, 'धर्माचा गांजा..'

Kajol Statement on Modi: अभिनेत्री काजोलने केलेल्या विधानावरुन मोठा वाद निर्माण झालेला असताना आता ठाकरे गटाने या विषयावरुन थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या समर्थकांना लक्ष्य केलं आहे.

काजोलचे काय चुकले? मोदींच्या शिक्षणाचा उल्लेख करत ठाकरे गटाचा सवाल; म्हणाले, 'धर्माचा गांजा..'

Kajol Statement on Modi Row: अभिनेत्री काजोलने (Kajol) देशातील राजकीय नेत्यांच्या शिक्षणासंदर्भात केलेल्या विधानावरुन (uneducated political leaders comment) रान उठलेलं असतानाच उद्धव ठाकरे गटाने काजोलची बाजू घेतली आहे. थेट पंतप्रधान मोदींच्या शैक्षणिक पात्रतेचा उल्लेख करत ठाकरे गटाने "काजोल महाराष्ट्र कन्या असल्याने परखडपणा तिच्या स्वभावात असणारच," असं म्हणत ती बोलली त्यात चुकले काय?" असा सवाल या विषयावरुन टीका करणाऱ्यांना केला आहे. काजोलने अंधभक्तांच्या डोळ्यात ज्ञानाचे काजळ घातले खरे, पण तरीही भक्त आंधळेच राहिले, असा टोलाही ठाकरे गटाने काजोलच्या विधानाला विरोध करणाऱ्यांना लगावला आहे.

तिचे काय चुकले?

"देशाचे सध्याचे राजकारण म्हणजे अडाण्यांचा गाडा झाला आहे व त्यावरच अभिनेत्री काजोलने आपले परखड मत व्यक्त केले. शैक्षणिक पार्श्वभूमी नसलेले राजकारणी देश चालवत आहेत, असे काजोलने म्हटले. आपल्या देशातील अंधभक्तांनी यावर गोंधळ घालण्यास सुरुवात केली. अंधभक्तांनी असा समज करून घेतला की, काजोलने सध्याच्या दिल्ली सरकारवर आपले मत व्यक्त केले व त्यांनी काजोलला नेहमीप्रमाणे ‘ट्रोल’ करण्यास सुरुवात केली. आपल्या देशातील एक उच्चशिक्षित कलाकार लोकांना शिक्षणाचे महत्त्व समजावून सांगते व तसे केल्याबद्दल भारतीय जनता पक्षाच्या ‘ट्रोल धाडी’ त्या अभिनेत्रीवर तुटून पडतात. देशात वैचारिक बदलांची प्रक्रिया खूपच संथगतीने सुरू आहे. कारण शैक्षणिक पार्श्वभूमी नसलेले राजकारणी देश चालवत आहेत, असे काजोलने सांगितले. काजोलचे मत हे अनेकांच्या डोळ्यात अंजन घालणारे आहे. ती म्हणते, ‘‘आपण अजूनही परंपरा आणि जुन्या विचारधारेत अडकून पडलो आहोत. याचे कारण अर्थातच शिक्षणाचा अभाव हेच आहे. देश चालवणाऱ्या अनेक नेत्यांकडे दूरदृष्टीचा अभाव दिसून येतो. शिक्षणामुळेच तुमच्यात दूरदृष्टी येते. विविध दृष्टिकोनातून पाहण्याची संधी तुम्हाला शिक्षणामुळेच मिळते,’’ असे काजोलने सांगितले. यात तिचे काय चुकले?" असा सवाल 'सामना'मधून ठाकरे गटाने उपस्थित केला आहे.

तिचं बोलणं नेमके कुणाला व का झोंबले?

काजलचं काय चुकलं विचारतानाच, "चौथी पास राजाचे अंधभक्त, समर्थक काजोलवर तुटून पडले. काजोल महाराष्ट्र कन्या असल्याने परखडपणा तिच्या स्वभावात असणारच. पुन्हा शिक्षणासंदर्भात विचार देणारे महात्मा फुले याच मातीतले. महात्मा फुले यांनी शिक्षणाचा पुरस्कार केला. ते सांगतात, विद्येविना मती गेली... मतीविना नीती गेली... नीतीविना गती गेली... गतीविना वित्त गेले... वित्ताविना शूद्र खचले... इतके अनर्थ एका अविद्येने केले... महात्मा जोतिराव फुले व सावित्रीबाई फुले यांनी लोकांना शहाणे व शिक्षित करण्यासाठी शर्थ केली. त्याच सावित्रीची लेक काजोल शिक्षणाची महती सांगत आहे. काजोलने शिक्षणाचे महत्त्व सांगितले, ते नेमके कुणाला व का झोंबले? तिने तर कुणाचेच नाव घेतले नव्हते," असं असंही ठाकरे गटाने म्हटलं आहे.

पंतप्रधानांना डिग्री लपवून ठेवावी लागली व सर्वत्र हसे झाले

"देशातील विकास, शिक्षण, लोकशाही यावर तिला मत व्यक्त करण्याचा अधिकार नाही काय? डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले, ‘‘शिका व संघर्ष करा.’’ अज्ञान हे घातक असते. अज्ञानातून अंधश्रद्धा व अंधभक्तांची पैदास वाढते. भारत देश सध्या या अंधारातून प्रवास करीत आहे. अंधभक्तांना काजोलचे वक्तव्य झोंबले. कारण त्यांच्यासमोर त्यांचे विश्वगुरू पंतप्रधान मोदींचे चित्र व चरित्र आहे. पंतप्रधान मोदी हे गुजरातमधील एका प्लॅटफॉर्मवर चहा विकत होते, पण ते ज्या गावात चहा विकत होते असे सांगतात, त्या गावात तेव्हा रेल्वेही नव्हती तर प्लॅटफॉर्म तरी कसा असेल? प्रश्न चहा विकणारा पंतप्रधान झाला हा नाही, तर पंतप्रधान त्यांची शैक्षणिक अर्हता लपवीत आहेत. आपण उच्चविद्याविभूषित आहोत, हे दाखविण्यासाठी मोदी यांच्या वतीने गृहमंत्री अमित शहा यांनी एक बनावट ‘डिग्री सर्टिफिकेट’ जाहीर केले. पंतप्रधानांना शेवटी त्यांची डिग्री लपवून ठेवावी लागली व सर्वत्र त्यांचे हसे झाले. कोरोना काळात पंतप्रधान मोदी यांनी ‘थाळ्या व घंटा’ वाजवून कोरोना पळवून लावण्याचे आवाहन केले, कोणतीही पूर्वकल्पना न देता नोटाबंदी जाहीर केली व लोकांना रांगेत उभे करून मारले हे शैक्षणिक पार्श्वभूमी नसल्याचेच ‘झटके’ आहेत," असा टोला ठाकरे गटाने लगावला आहे.

शिक्षण व शहाणपण नसल्याचे लक्षण

"पंतप्रधान मोदींचे सहकारी तर त्यांच्यापेक्षा वरचढ आहेत. हिंदूंनी चार पोरांना जन्म द्यावा. लोकसंख्या वाढवावी, असे मोदींचे मंत्री सांगतात. चार पोरांपैकी दोन ‘संघा’ला द्या असेही सांगतात. हे सभ्य व सुसंस्कृतपणाचे लक्षण नाही. मध्य प्रदेशात भाजपचा एक पदाधिकारी एका गरीब मागासवर्गीय व्यक्तीच्या अंगावर लघुशंका करतो. मग त्या पीडित व्यक्तीस मुख्यमंत्री शिवराजमामा त्यांच्या निवासस्थानी बोलावून त्याची पूजा करतात. आता समजले की, ज्याची पूजा केली ती व्यक्ती कुणी वेगळीच होती. त्यामुळे मामांचे हसे झाले. हेच शिक्षण व शहाणपण नसल्याचे लक्षण," असं या लेखात म्हटलं आहे.

धर्माचा गांजा ओढून..

"पंतप्रधान मोदी भ्रष्टाचाराविरुद्ध लढण्याची भाषा करतात. भोपाळच्या मेळाव्यात त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस व अजित पवारांच्या भ्रष्टाचारावर हल्ला केला, पण लगेच दुसऱ्या दिवशी भाजपने अजित पवारांच्या गटास त्यांच्या भ्रष्टाचारासह स्वीकारले. शिक्षणाचा अभाव असल्याचेच हे लक्षण. जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थ्यांवर पोलिसांनी हल्ला केला. तेव्हा अभिनेत्री दीपिका पदुकोण विद्यापीठाच्या आवारात जाऊन काही क्षण तेथे ‘मौन’ उभी राहिली. तिने भाषण केले नाही, पण दीपिकाचे मौन हा संस्कार व शिक्षणाचा प्रभाव होता, पण त्यानंतर दीपिकावर झालेले असभ्य हल्ले, तिच्या चित्रपटांवरील बहिष्कार हे अज्ञान, अंधकारात देश चाचपडत असल्याचे लक्षण होते. आता देशाच्या शहाणपणावर प्रश्न निर्माण केल्याने अभिनेत्री काजोलही असभ्य, अज्ञानी लोकांच्या निशाण्यावर आली. या देशात सध्या शिक्षणावर बोलण्याची सोय राहिलेली नाही. धर्माचा गांजा ओढून शिक्षितही अंधभक्त बनले आहेत. त्यावर उपाय काय? काजोलने अंधभक्तांच्या डोळ्यात ज्ञानाचे काजळ घातले खरे, पण तरीही भक्त आंधळेच राहिले!" असा टोला लेखाच्या शेवटी लगावण्यात आला आहे.

Read More