Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

कोकणात शिमगोत्सवाला प्रारंभ

 कोकणच्या पारंपरिक ढोल ताशांच्या गजरात शिमगोत्सवाला प्रारंभ झालाय. कोकणातील गावागावातील ग्रामदेवतांच्या पालख्या सजु लागल्यात 

कोकणात शिमगोत्सवाला प्रारंभ

प्रणव पोळेकर, रत्नागिरी : कोकणच्या पारंपरिक ढोल ताशांच्या गजरात शिमगोत्सवाला प्रारंभ झालाय. कोकणातील गावागावातील ग्रामदेवतांच्या पालख्या सजु लागल्यात. मोठ्या संख्येने गावात दाखल  झालेल्या चाकरमान्यासह कोकणी माणूस पोफळीच्या होळ्या उभ्या  करतोय.गावात दाखल झालेल्या चाकरमान्यासह आपल्या ग्रामदेवतांच्या पालख्या डोक्यावर घेत नाचत कोकणी माणूस आपला शिमगोत्सव साजरा करतोय.

जागोजागी नाचवली जाणारी पालखी

ढोलताशाच्या गजरात वाजत गाजत निघालेली मिरवणूक. जागोजागी नाचवली जाणारी पालखी. बच्चेकंपनी असो किंवा गावातली मोठी मंडळी... प्रत्येकाच्या चेह-यावर वेगळाच उत्साह आणि आनंद. अशी दृष्यं कोकणातल्या पारंपरिक शिमगोत्सवाची दिसून येतात. इथं प्रत्येक गावात वेगवेगळ्या दिवशी शिमगोत्सव साजरा होतो. 

इथं ही प्रत्येकाचा परंपरेने आलेला मान 

काहींचा शिमगा तेरसा म्हणजे त्रयोदशीला आणि काही ठिकाणी पोर्णिमेला ग्रामदैवतेच्या होळ्या उभ्या करण्याची पद्धत. तेरसा शिमग्याला गावातच पोफळीची होळी निश्चित केली जाते. मग सगळा गाव मिळून पोफळीची ही प्रचंड होळी उचलत आणि नाचवतच आणि अगदी धावतच वर्षानुवर्षाच्या गावाच्या निश्चित केलेल्या जागी आणली जाते.. इथ सगळा गाव एकत्र येत पोफळीची ही प्रचंड होळी उभी करतो शेकडो हात एकत्र येतात आणि इतकी मोठी होळी पाहता पाहता लीलया उभी राहते.... इथं ही प्रत्येकाचा परंपरेने आलेला मान ठरलेला असतो आणि तो प्रत्येक जण पाळतो.

शिमगोत्सव हा दुसरा मोठा उत्सव

गणेशोत्सवानंतर कोकणवासियांसाठी शिमगोत्सव हा दुसरा मोठा उत्सव. आपल्या गावापासून कितीही दूर असला तरी कोकणी माणूस या उत्सवासाठी गावाकडे परततोच. कोकणातील प्रत्येक गावात आपली एक वेगळी परंपरा आहे आणि प्रत्येक गाव ती परंपरा टिकवण्याचा आणि जपण्याचा प्रयत्न  करतो. कदाचित या परंपराच या गावाच्या समाजव्यवस्थेचा कणा असतात. यामुळेच कोकणातील प्रत्येक गावात वर्षानुवर्ष पारंपरिक पद्धतीने साजरा होणा-या शिमगोत्सवाच्या उत्साहात कुठे कमतरता येत नाही.

Read More