Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

संतापजनक, शाळकरी मुलीसह वडिलांना टोईंग गाडीत कोंबले

नो-पार्किंगमध्ये गाड्या उभ्या करणाऱ्यांविरोधात जोरदार मोहीम हाती घेण्यात आली आहे. मात्र, याचा त्रास नाहक एका चिमुकल्या शाळकरी मुलीला सहन करावा लागला. 

संतापजनक, शाळकरी मुलीसह वडिलांना टोईंग गाडीत कोंबले

सोलापूर : सध्या शहरात नो-पार्किंगमध्ये गाड्या उभ्या करणाऱ्यांविरोधात जोरदार मोहीम हाती घेण्यात आली आहे. मात्र, याचा त्रास नाहक एका चिमुकल्या शाळकरी मुलीला सहन करावा लागला. गाड्या उचलणाऱ्या क्रेनवर शाळकरी मुलीसह तिच्या वडिलांनाही उचलून नेण्यात आले. त्यामुळे या कारवाईबाबत संताप व्यक्त होत आहे. मुलीला शाळेत सोडायचे आहे, असे सांगूनही कर्मचारी ऐकत नव्हते. उलट दुचाकीसह त्यांनाच क्रेनमध्ये बसवून नेले. दरम्यान, याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर ही बाब पुढे आलेय.

नो-पार्किंग झोनमध्ये लावण्यात आलेली वाहने उचलण्यासाठी आलेल्या पोलीस आणि झीरो कर्मचाऱ्यांनी आज वाहन उचलल्यानंतर त्याच क्रेनमध्ये शाळकरी मुलगी आणि तिच्या वडिलांना घालून नेल्याच्या घटनेने सोलापुरात पोलिसांविरोधात संतापाची लाट उसळली आहे. याबाबत संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी उचलून धरण्यात आलेय.

अंबादास मेरगू हे दुचाकीवरून मुलीला शाळेत सोडण्यासाठी निघाले होते. वाटेत ते सिव्हिल हॉस्पिटलमध्ये असलेल्या लक्ष्मी मंदिरात दर्शन घेण्यासाठी थांबले. दुचाकी मंदिराच्या बाजूला लावून ते मुलीसह दर्शनाला गेले. मात्र, शहरात फिरणारी क्रेन त्यावेळी आली. मेरगू यांची दुचाकी उचलली. मेरगू यांच्या लक्षात येताच त्यांनी मला मुलीला शाळेत सोडायला जायचे आहे. उशीर होत आहे. मला दुचाकी परत द्या, अशी विनंती त्यांनी पोलीस आणि कर्मचाऱ्यांना केली; परंतु पोलीस आणि कर्मचाऱ्यांनी मेरगू यांची विनंती धुडकावून लावत उलट मेरगू आणि त्यांच्या शाळकरी मुलीला क्रेनवर बसवून वाहतूक कार्यालयात नेले आणि तेथे २५० रुपयांचा दंड वसूल केला.

Read More