Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

बारामतीत डॉक्टरला लाथाबुक्क्यांनी मारहाण, धक्कादायक Video आला समोर

डॉक्टरांवर हल्ल्याच्या घटनांमध्ये वाढ, मनमाडनंतर आता बारामतीत डॉक्टरांना मारहाण

बारामतीत डॉक्टरला लाथाबुक्क्यांनी मारहाण,  धक्कादायक Video आला समोर

जावेद मुलानी, झी मीडिया, बारामती : जिल्ह्यात एका डॉक्टरला मारहाण झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. डॉक्टरने घराचा दरवाजा उघडला नाही म्हणून चौघांनी डॉक्टरला मारहाण केली. पोलिसांच्या माहितीनुसार, डॉक्टर युवराज गायकवाड यांचा सांगवी इथं साई क्लिनिक या नावाने दवाखाना आहे, इथेच ते राहतात. घरामध्ये डॉक्टर गायकवाड हे जेवण करत होते. यावेळी चार जणांनी त्यांच्या घराचा दरवाजा ठोठावला. पण जेवण करत असल्याने डॉक्टर गायकवाड यांनी दरवाजा उघडला नाही. त्यामुळे संतापलेल्या त्या चार जणांनी चक्क खिडकीची काच फोडली. 

काच फोडल्याने डॉक्टर घराचा दरवाजा उघडून बाहेर आले, त्यावेळी त्या चार जणांनी डॉक्टरांना थेट लाथा बुक्क्यांनी मारायलाच सुरुवात केली. अचानक झालेल्या हल्ल्याने डॉक्टर काहीसे गोंधळले. बाहेरचा गोंधळ ऐकून डॉक्टर गायकवाड यांचा मुलगा विराज घराबाहेर आला. त्यावेळी त्यालाही मारहाण करण्यात आली. मारहाणीचा हा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. याप्रकरणी डॉक्टर गायकवाड यांनी माळेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. यावरुन पोलिसांनी 4 जणांवर गुन्हा दाखल केला असून पुढीत पास पोलीस करत आहेत. 

मनमाडमध्येही डॉक्टरला मारहाण
दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच मनमाडमध्येही डॉक्टरला मारहाण झाल्याची घटना समोर आली होती. चुकीचे उपाचार आणि रिपोर्ट न दिल्याचा आरोप करत रुग्णांच्या नातेवाईकांनी डॉक्टरला लाथ- बुक्यांनी बेदम मारहाण करत राडा घातल्याची घटना मनमाडमध्ये घडली होती. जिल्ह्यातल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात असलेल्या गांधी हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर जिंतेंद्र गांधी यांना मारहाण करून हॉस्पिटलमध्ये साहित्यांची तोडफोड करण्यात आली. मारहाणीचा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला होता.

मनमाडच्या  छत्रपती शिवाजी महाराज चौकात असलेल्या गांधी हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर जितेंद्र गांधी हे संध्याकाळच्या सुमारास दवाखान्यात नेहमीप्रमाणे रुग्णांना तपासत होते. यावेळी पाच ते सहा तरुण हॉस्पिटलमध्ये घुसले त्यांनी डॉक्टरांकडे उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या आपले नातेवाईक अनुष्का गरुड या मुलीचे रिपोर्ट आम्हाला द्या अशी मागणी केली आणि डॉक्टरांना मारहाण करण्यास सुरुवात केली.

Read More