Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

Buldhana Accident : 25 जण होरपळलेल्या बसचा चालक मद्यधुंद अवस्थेत पळवत होता गाडी; अहवालातील माहिती

Buldhana Accident : समद्धी महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात 25 जणांचा जळून मृत्यू झाला होता. बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा जवळी पिंपळखुटा समृद्धी महामार्गावर अपघातानंतर विदर्भ ट्रॅव्हलच्या बसने पेट घेतला होता.

Buldhana Accident : 25 जण होरपळलेल्या बसचा चालक मद्यधुंद अवस्थेत पळवत होता गाडी; अहवालातील माहिती

Samruddhi Expressway Bus Accident : बुलढाण्यात (Buldhana Accident) समृद्धी महामार्गावर विदर्भ ट्रॅव्हल्सच्या बसला झालेल्या अपघातातबाबत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. समृद्धी द्रुतगती मार्गावर (Samruddhi Expressway) 1 जुलै रोजी झालेल्या भीषण अपघातात 25 जणांचा जळून मृत्यू झाला होता. मद्यधुंद चालकाच्या चुकीमुळेच हा अपघात झाल्याची धक्कादायक माहिती आता समोर आली आहे. फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी अमरावतीच्या रासायनिक विश्लेषण अहवालानुसार, बसचा चालक शेख दानिशच्या अपघाताच्या दिवशी गोळा केलेल्या रक्ताच्या नमुन्यात मद्य हे मर्यादेपेक्षा 30 टक्क्यांपेक्षा जास्त होते. त्यामुळे हा अपघात झाल्याचे म्हटलं जात आहे.

बुलढाणा अपघातातून बसचा चालक दानिश इस्माईल शेख आणि त्याचा सहकारी अरविंद जाधव हे दोघेही बचावले होते. या दोघांनाही किरकोळ जखमा झाल्या आहेत. बस डिव्हायडरला धडकून उलटताच हे दोघे बसच्या काचा फोडून पळाले, असे बसमधून वाचलेल्या दोन प्रवाशांनीच सांगितले होते. त्यानंतर पोलिसांनी चालक दानिश इस्माईल शेख याला ताब्यात घेतले होते आणि त्याची चौकशी करण्यात येत होती. त्यानंतर आता गाडी चालवताना दानिशने दारु प्यायली असल्याचे समोर आले आहे. दानिशच्या रक्ताच्या नमुन्यांमध्ये मद्य प्रमाणाच्या बाहेर असल्याचे समोर आले आहे.

महाराष्ट्रात रक्तातील अल्कोहोल सामग्री (BAC) कायद्यानुसार मद्याची मर्यादा 0.03 टक्के आहे किंवा 100ml रक्तामध्ये 30mg अल्कोहोलचे प्रमाण असायला हवे. टायर फुटल्यामुळे अपघात झाला नाही असा निष्कर्ष काढण्यासाठी टायरच्या खुणा आणि अपघात टाळण्यासाठी टाळाटाळ करणाऱ्या युक्तींचा अभाव यासारख्या पुराव्यांचाही फॉरेन्सिक अहवालात विचार करण्यात आला आहे. पुराव्यांवरून ड्रायव्हर झोपला होता आणि त्यानंतर बस दुभाजकाच्या भिंतीवर आदळली. बस चालकाविरोधात आयपीसी कलम 304 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बस चालक दानिशच्या रक्ताच्या अहवालामुळे त्याला दोषी ठरवले जाऊ शकते. यासाठी त्याला 10 वर्षे तुरुंगवास आणि दंड होऊ शकतो.

दरम्यान, फॉरेन्सिक फायर अँड सायबर इन्वेस्टीगेटर्स या मुंबईच्या संस्थेने त्या संदर्भात तपास करून एक अहवाल बुलढाणाच्या जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला होता. यानुसार अपघात झाला तेव्हा बस समृद्धी महामार्गाच्या पहिल्या लेनमध्ये होती. अपघाताच्या वेळी बसचा वेग 70 ते 80 किलोमीटर प्रति तास होता.

कसा घडला अपघात?

विदर्भ ट्रॅव्हल्सची MH 29 BE – 1819 क्रमांकाची ही बस नागपूरहून पुण्याकडे जात होती. 30 जूनला नागपूरहून संध्याकाळी 5 वाजता ही बस पुण्यासाठी निघाली होती. या बसमध्ये नागपूर, वर्धा आणि यवतमाळ येथील प्रवासी होती. 1 जुलैच्या रात्री 1.22 मिनिटांनी पिंपळखुटा गावाजवळ धावती बस दुभाजकाला धडकली. धडकेनंतर बस पलटली आणि डिझेल टाकीचा स्फोट झाला. यामुळे संपूर्ण बसने पेट घेतला. काही कळायच्या आता बस पेटल्याने अनेकांना त्यातून बाहेर पडता आले नाही. या अपघातात 25 प्रवाशांचा जळून कोळसा झाला. 

Read More