Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

शरद पवार यांची पत्रातून भावनिक बाजू समोर, आठवणींना दिला उजाळा

शरद पवार. (Sharad Pawar) महाराष्ट्रातील उत्तुंग व्यक्तिमत्व आणि नेता. परंतु त्यांनी एक पत्र लिहिले आणि त्यांची दुसरी बाजु समोर आली. या पत्राचीच चर्चा सर्वत्र सुरु आहे.  

शरद पवार यांची पत्रातून भावनिक बाजू समोर, आठवणींना दिला उजाळा

मुंबई : शरद पवार. (Sharad Pawar) महाराष्ट्रातील उत्तुंग व्यक्तिमत्व आणि नेता. सामन्यांच्या प्रश्नांची नाडी माहीत असणारा जाणते व्यक्तिमत्व. गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत राजकारणाशी जोडलेली नाळ, अशी त्यांची ओळख. पवार यांचा राजकारणात कोणीही हात धरणे अशक्य आहे. इतकेच काय तर महाराष्ट्र (Maharashtra) राज्यातही महाविकास आघाडीचे सरकार (Mahavikas Aghadi Government) स्थापन करण्यात शरद पवार यांनी महत्त्वाची भूमिका आहे. पवार यांच्याबद्दल त्यांना ओळखणारे भरभरुन बोलू शकतात. मात्र, त्यांच्या मनात काय आहे, हे आजही कोणीही सांगू शकलेले नाही. परंतु त्यांनी एक पत्र लिहिले आणि त्यांची दुसरी बाजु समोर आली. या पत्राचीच चर्चा सर्वत्र सुरु आहे. शरद पवार यांची पत्रातून (Sharad Pawar's letter) भावनिक बाजू समोर आली आहे आणि त्यांच्या आठवणींना उजाळा मिळाला आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP)  अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी दिवाळीनिमित्त (Diwali) आईला भावनिक पत्र  (Sharad Pawar's Emotional letter to mother) लिहिले आहे. पत्रात ( letter) आईची (Mother) उणीव भासत असल्याची भावना पत्रातून व्यक्त केली आहे. पत्रात पवारांनी नेमकं काय म्हटले आहे, याची उत्सुकता आहे. पत्रास सुरुवात करताना साष्टांग नमस्कार, म्हणत पत्रास उशीर झाला म्हणून क्षमस्व ! मागील वर्ष खूप धकाधकीचे गेले, असे म्हटले आहे. त्यांनी अनेक गोष्टीवर आणि प्रसंगावर या पत्रात भाष्य केले. मात्र, आईला घातलेली साथ सर्व काही सांगून जाते.

शरद पवार यांनी आपल्या दिवंगत आईला एक भावनिक पत्र लिहिले आहे. त्यांनी आपल्या आईचे आभार व्यक्त करत आपल्या मनातील खंत या पत्राद्वारे बोलून दाखवली आहे.

खचून जाण्याचा प्रश्चच नव्हता... 

लोकसभा निवडणुकीत संयुक्त पुरोगामी आघाडीला यश आले नाही. पक्ष अडचणीत असताना काही जवळचे, काही ज्येष्ठ सहकारी देखील सोडून गेले. काही महिन्यांतच राज्याच्या विधानसभा निवडणुकीत विजय मिळवण्याचे मोठे आव्हान उभं राहिले. पण तुम्ही मला हार न मानता, खचून न जाता झुंजण्याचे बाळकडू दिले आहे. मग खचून जाण्याचा प्रश्चच नव्हता, असे त्यांनी पत्रात म्हटले आहे. 

मला चांगले आठवत आहे. बैलाने मारल्यामुळे तुमचा एक पाय अधू झाला. पण तुम्ही नेटाने संसार केला आणि सार्वजनिक कामात देखील झोकून दिले. या प्रेरणेच्या बळावरच मी पुन्हा उभारी घेण्याचा निर्धार केला. महाराष्ट्राचा कानाकोपरा पिंजून काढला. 

तरुणाईचा उत्साह मिळाला आणि... 

fallbacks

शरद पवार यांच्या ट्विटर वॉलवरुन छायाचित्र.

हे करत असताना मला तरुणाईने डोक्यावर घेतले. मला नवा उत्साह मिळाला, मी साताऱ्याच्या सभेत मुसळधार पाऊस अंगाखांद्यावर घेतला. तो पाऊस जनतेच्या मनात झिरपला आणि मतांमधून व्यक्त झाला. महाराष्ट्रात नवीन समीकरणे तयार होऊन आपलं सरकार आलं. नवे सरकार जेव्हा शपथ घेत होते, तेव्हा माझ्या पहिल्या वहिल्या निवडणुकीला अर्ज भरण्यापूर्वी तुम्ही जे मार्गदर्शन केलं ते लक्षात होते, या आठवणीला पत्रातून त्यांनी उजाळा दिला.

.. आणि असे संस्कार माझ्यावर झाले !

राजकीय धामधुमी कमी झाली तसे कोरोना महामारीचं संकट ओढवले. त्यातून अद्याप दिलासा नाही पण वेळ काढून तुम्हाला पत्र लिहितोय. बाई, तुमच्यात उपजतच नेतृत्वाचे गुण होते. तुम्ही कौटुंबिक जबाबदारी सांभाळत असतानाच १९३५ च्या पहिल्या जिल्हा लोकल बोर्डावर निवडून गेलात. लोकल बोर्डावरील विविध जबाबदाऱ्या पार पाडताना तुम्ही आपली वेगळी छाप उमटवली. अगदी तान्हं मूल कडेवर घेऊन, खडतर प्रवास करत तुम्ही बोर्डाच्या बैठकांना जात असत. कळत-नकळत हे सगळे संस्कार माझ्यावर झाले आणि मी सार्वजनिक जीवनात समाधानकारक कामगिरी करू शकलो.

ही शिकवण तुमच्याकडूनच मिळाली..

राजकीय मतभिन्नता असली तरी परस्पर सुसंवाद राहायला हवा ही शिकवण मला तुमच्याकडूनच मिळाली. माझ्या  ७५ व्या वाढदिवसानिमित्त दिल्ली येथे झालेल्या सत्कारप्रसंगी  राष्ट्रपती, आजी-माजी प्रधानमंत्र्यांसहित भारतातील सर्वपक्षाचे प्रमुख भेदाभेद विसरून उपस्थित होते. हा अपूर्व सोहळा अशा सुसंवाद राखण्याच्या संस्काराचे फलित आहे, असे मी मानतो. त्या सत्कारप्रसंगी तुमचीच मूर्ती माझ्या डोळ्यांसमोर दिसत होती.

कौटुंबिक जबाबदारी आणि सामाजिक बांधिलकी या दोन्ही बाबी समान न्यायाने सांभाळत, सामान्यांसाठी अखंड काळ काम करत राहण्याचा आपण दिलेला सल्ला मी जतन करीत आहे. तुमच्या संस्काराने आम्ही सर्व भावंडे वेगवेगळ्या क्षेत्रात यशस्वी झालो. आपले क्षेत्र स्वत:च्या आवडी-निवडी नुसार निवडायचे स्वातंत्र्य आपण दिले. आणि ते देत असताना आमच्यावर तुमचे सतत लक्ष असायचे हे मला ठावूक आहे. ‘आम्ही पुण्यात महाविद्यालयीन शिक्षणात लक्ष देतो की नाही, आमचे सवंगडी कोण आहेत, अन्य कोणत्या क्षेत्रात आम्ही रस घेतो’ हे तुम्ही कटाक्षाने पाहायचा.

आईबद्दल एक तक्रार

तुम्ही आमच्यासाठी एवढं काही केलेत, पण आम्हा भावंडांची तुमच्याबद्दल एक तक्रार आहे. मी एक दिवस राज्याच्या प्रमुखाची जबाबदारी स्वीकारावी असे तुमचे स्वप्न होते. पण मी राज्याचा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताना तुम्ही नव्हतात. अप्पासाहेबांना आणि प्रतापरावांना पद्मश्री पुरस्कार मिळाला तेव्हाही नव्हतात. भारत सरकारने मला पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित केले, त्यावेळी पुन्हा तुमच्या आठवणींनी मी हळवा झालो. चेहऱ्यावर लवलेश दाखवत नसलो तरी तुमची आठवण मनात आजही एक पोकळी निर्माण करते, मनात गहिवर आणते.

दिवाळीत सर्व कुटुंबियांनी बारामतीला एकत्र यायचे हा तुमचा निर्णय आम्ही सगळे कटाक्षाने पाळत आहोत. मात्र ऐन दिवाळीत तुमची खूप उणीव भासते आहे. अधिक काही लिहित नाहीतुमचा शरद.

Read More