Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

अजित पवारांना पक्षात परत घेणार का? शरद पवारांचं मोजून 4 शब्दात उत्तर; म्हणाले, 'सवालही..'

Sharad Pawar On Ajit Pawar: शरद पवार यांना पत्रकार परिषदेमध्ये अजित पवार गटासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी अगदी मोजक्या शब्दांमध्ये या प्रश्नाला उत्तर दिलं.

अजित पवारांना पक्षात परत घेणार का? शरद पवारांचं मोजून 4 शब्दात उत्तर; म्हणाले, 'सवालही..'

Sharad Pawar On Ajit Pawar: महाविकास आघाडीमधील काँग्रेस, शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे गटाने चांगलं यश संपादन केलं. महाविकास आघाडीने 30 जागा मिळवल्या. महायुतीला केवळ 17 जागांवर समाधान मानावं लागलं. महायुतीमधील भारतीय जनता पार्टी, अजित पवार गट आणि एकनाथ शिंदे गट यापैकी एकाही पक्षाला दुहेरी आकडा गाठता आला नाही. राज्यातील विधानसभा निवडणुका तोंडावर आहेत. पुढील काही महिन्यांमध्ये निवडणुकांची घोषणा होईल अशी दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. असं असतानाच शनिवारी महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची मुंबईत संयुक्त पत्रकार परिषद पार पाडली. या पत्रकार परिषदेमध्ये अनेक महत्त्वाचे नेते उपस्थित होते. यामध्ये शरद पवारांचाही समावेश होता. शरद पवारांना अजित पवार परतले तर त्यांना परत घेणार का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी अगदी मोजक्या शब्दांमध्ये उत्तर दिलं.

अजित पवार गटाला धक्का

2023 मध्ये मे महिन्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली. अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली पक्षातील अनेक आमदार सरकरामध्ये सहभागी झाले. अजित पवार गटातील 9 आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेत सरकारमध्ये सहभागी होत असल्याचं जाहीर केलं. राष्ट्रवादीमधील या फुटीनंतर अजित पवार गट भाजपा- शिंदे गटाबरोबर आणि शरद पवार गट विरोधात अशी राजकीय स्थिती निर्माण झाली. शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या फुटीनंतर पहिल्यांदाच झालेल्या कोणत्याही मोठ्या निवडणुकीमध्ये अजित पवार गटाच्या वाट्याला केवळ 4 जागा आल्या. त्यापैकी केवळ रायगडमध्ये सुनील तटकरेंना विजय मिळवण्यात यश आलं. खुद्द अजित पवार यांची पत्नी सुनेत्रा पवार यांना बारामतीमध्ये पराभवाचं तोंड पहावं लागलं.

शरद पवार गटाची दमदार कामगिरी

दुसरीकडे केवळ 10 जाग लढवणाऱ्या शरद पवार गटाने तब्बल 8 जागा जिंकल्या. सर्वाधिक स्ट्राइक रेटचा विचार केल्यास राज्यात शरद पवार गट हा एक नंबरचा पक्ष ठरला. शर पवार गटाच्या कामगिरीने विरोधकांनाही आश्चर्याचा धक्का बसल्याची राजकीय वर्तुळात चर्चा झाली. असं असतानाच आता विधानसभेआधी महायुतीमध्ये काहीतरी मोठ घडणार असल्याच्या चर्चाही रंगू लागल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर शरद पवारांना सोडून गेलेल्यांना पुन्हा पक्षात घेतलं जाणार का? त्यांच्यासाठी परतीचे दार कायमचे बंद झाले का? असं शरद पवारांना विचारण्यात आलं असता त्यांनी मोजून चार शब्दांमध्ये उत्तर दिलं. 

नक्की वाचा >> 'केंद्रातील सरकार कधीही पलटू शकतं, काँग्रेसने..'; 'आपण एक गोष्ट विसरतोय' म्हणत खासदाराचं विधान

शरद पवारांचं चार शब्दांमध्ये उत्तर

'तुमचेही काही लोक तुम्हाला सोडून गेले आहेत. ते परत आले तर तुम्ही त्यांना परत घेणार का?' असा प्रश्न शरद पवारांना पत्रकार परिषदेत विचारण्यात आला. या प्रश्नाला शरद पवारांनी अवघ्या चार शब्दांत उत्तर दिलं. अजित पवारांबरोबरच त्याच्या गटातील आमदारांना परत घेण्यासंदर्भातील प्रश्नावर प्रतिक्रिया देताना शरद पवारांनी, “सवालही पैदा नही होता,” असं म्हटलं. म्हणजेच जे सोडून गेले आहेत त्यांना पुन्हा पक्षात घेणार नाही, असं पवारांनी म्हटलं आहे.

मोदी, भाजपावर टीका

दरम्यान, या पत्रकार परिषदेमध्ये उद्धव ठाकरे आणि शरद पवारांनी भाजपाबरोबरच पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला. लोकसभेची ही निवडणूक अंतिम नसून ही लढाई आता सुरू झाली आहे, असा इशाराही पवार तसेच ठाकरेंनी दिला. विधानसभेला महाविकास आघाडी अधिक ताकदीने लढणार आहे, असं यावेळेस महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सांगितलं. या बैठकीला शरद पवार आणि उद्धव ठाकरेंबरोबरच काँग्रेसकडून पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात आदी नेते उपस्थित होते.

Read More