Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

बारामती दौरा अचानक रद्द करून शरद पवार मुंबईकडे रवाना

शरद पवार त्यांचा बारामती दौरा अचानक रद्द करून मुंबईकडे रवाना झाले आहेत. 

बारामती दौरा अचानक रद्द करून शरद पवार मुंबईकडे रवाना

पुणे : शरद पवार त्यांचा बारामती दौरा अचानक रद्द करून मुंबईकडे रवाना झाले आहेत. मुंबईवरुन बारामतीला निघालेले शरद पवार मध्येच पुण्यात मोदी बागेत थांबले, आणि आता ते पुण्यावरुन पुन्हा मुंबईला निघाले आहेत. पार्थ पवार नाराज असताना शरद पवार बारामतीसाठी निघाले होते, पण अचानक दौरा रद्द करुन ते पुन्हा मुंबईला यायला का निघाले? असा प्रश्न उपस्थित होत आहे. शरद पवार यांच्यासोबत त्यांच्या पत्नी प्रतिभा पवारही आहेत.

पार्थ पवार हे अपरिपक्व आहेत, त्यांच्या मागणीला आम्ही कवडीचीही किंमत देत नाही, असं शरद पवार म्हणाल्यामुळे एकच खळबळ माजली होती. शरद पवारांच्या या वक्तव्यामुळे पार्थ पवार कमालीचे दुखावले. यानंतर पार्थ पवार यांनी कुटुंबातल्या व्यक्तींच्या भेटीगाठी घ्यायला सुरुवात केली. 

कालच पार्थ पवार यांनी बारामतीमध्ये काका श्रीनिवास पवार आणि काकी शर्मिला पवार यांची भेट घेतली. सोबतच रात्री उशीरा अजित पवार, सुनेत्रा पवार आणि श्रीनिवास पवार, शर्मिला पवार यांच्यात बैठक झाल्याचीही माहिती आहे. पार्थ पवार, अजित पवार आणि सुनेत्रा पवार बारामतीमध्ये असल्यामुळे शरद पवारही बारामतीमध्ये जाण्यासाठी निघाले होते. 

दोन दिवसांमध्ये पार्थ पवार यांच्या संदर्भातला विषय निवळेल, असा विश्वास पवार कुटुंबातील निकटवर्तीयांनी व्यक्त केला आहे. सोबतच पार्थ पवार हे नाराज असल्याचं पहिल्यांदाच पवार कुटुंबातील व्यक्तीने मान्य केलं. पार्थ पवार चूक का बरोबर हे ठरवता येणार नाही. तसंच शरद पवारांच्या मताविषयी प्रश्न उपस्थित करता येणार नाही. साहेबांचं कुटूंबातील ज्येष्ठत्व आणि वय याचाही विचार करायला हवा. या सगळ्यात पार्थ दुखावला जाणे स्वाभाविक आहे, अशी प्रतिक्रिया पवार कुटुंबातल्या निकटवर्तीयांनी दिली. 

शरद पवारांनी पार्थ पवारांना खडसावल्यानंतर पवार कुटुंबामध्ये बैठकांची मालिका सुरू झाली. शरद पवारांनी केलेल्या या वक्तव्यानंतर अजित पवार यांनी मुंबईमध्ये लगेचच शरद पवारांची भेट घेतली. शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील या नेत्यांमध्ये बैठक झाली. दुसऱ्याच दिवशी पार्थ पवारही सिल्व्हर ओकवर जाऊन सुप्रिया सुळेंना भेटला. तब्बल सव्वादोन तास या दोघांमध्ये चर्चा झाली. एवढच नाही तर सुप्रिया सुळे यांनीही मंत्रालयात जाऊन अजित पवारांची भेट घेतली. 

Read More