Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

लोकसभा पोटनिवडणूक : साताऱ्यात उदयनराजे विरुद्ध श्रीनिवास पाटील

मुरलेले राजकारणी श्रीनिवास पाटील यांना मैदानात उतरवत राष्ट्रवादीनं चांगली खेळी खेळलीय

लोकसभा पोटनिवडणूक : साताऱ्यात उदयनराजे विरुद्ध श्रीनिवास पाटील

तुषार तपासे, झी २४ तास, सातारा : सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत उदयनराजे भोसले आणि श्रीनिवास पाटील यांच्यात लढत होतेय. दोन्ही उमेदवारांनी मतदारांच्या भेटीगाठी, पदयात्रांवर भर दिलाय. छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट १३ वे वंशज असलेले उदयनराजे भोसले पाच महिन्यांतच पुन्हा मतदारांना सामोरे जात आहेत. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाची त्सुनामी असताना ते राष्ट्रवादीच्या तिकिटावर तब्बल १ लाख २६ हजार मतांनी निवडून आले. यावरून त्यांची लोकप्रियता मोजता येऊ शकेल. आता ते पुन्हा एकदा कमळाच्या चिन्हावर जनतेला कौल लावत आहेत. समोर कुणीही असलं तरी आपणच निवडून येऊ, असा ठाम विश्वास उदयनराजेंना आहे.

तर दुसरीकडे मुरलेले राजकारणी श्रीनिवास पाटील यांना मैदानात उतरवत राष्ट्रवादीनं चांगली खेळी खेळलीय. गेल्या पाच वर्षांत भाजपानं थोडे फार हातपाय पसरले असले तरी जिल्ह्यात राष्ट्रवादीची चांगली ताकद आहे. शिवेंद्रराजे वगळता मतदारसंघातला एकही आमदार उदयनराजेंच्या मदतीला नाही. कराड आणि पाटणमधून पाटलांना चांगली मतं मिळू शकतात. राजेंनी शरद पवारांची साथ सोडल्यानं पक्षाला सहानुभूती मिळू शकते.

ही लढत दोन्ही पक्षांनी प्रतिष्ठेची केलीय. त्यामुळे विधानसभेसोबतच या लोकसभा मतदारसंघाकडेही राज्याचं लक्ष असेल. श्रीनिवास पाटील यांचा अनुभव आणि राष्ट्रवादीचा भक्कम पाया यामुळे उदयनराजेंना ही निवडणूक आधीएवढी सोपी जाणार नाही.

Read More