Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

आई-भावंडांचं पोट भरण्यासाठी मोलमजुरी करूनही तिनं यश मिळवलंच

तिला तिच्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी, समाजातल्या संवेदनशील साथीची गरज

आई-भावंडांचं पोट भरण्यासाठी मोलमजुरी करूनही तिनं यश मिळवलंच

मकरंद घोडके, झी मीडिया, अहमदनगर : वडिलांचं दीड वर्षापूर्वी अकाली निधन झालं. दहावीच्या परीक्षेच्या तोंडावरच आईदेखील अंथरुणाला खिळली. अशा परिस्थितीतही तिनं कच न खाता, घरातल्या भावंडांचा सांभाळ केला... सोबतच आईची सुश्रुषाही केली... आणि दहावीच्या परीक्षेत तिनं ९१ टक्के गुण मिळवलेत. ही कहाणी आहे नगरमधल्या जामखेड तालुक्यातल्या तेलंगशी गावातल्या राणी जायभाय हिच्या संघर्षाची... 

आपली चार भावंडं आणि आई यांची जबाबदारी अंगावर येऊन पडलेल्या राणीनं कुटुंब चालवण्यासाठी मोलमजुरीही केली. एसटीची सोय नसल्यानं पहाटे सहा वाजता दीड किलोमीटर कच्च्या रस्त्यावरुन पायी जाऊन, ती सकाळी ८ वाजता खर्डा इथल्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शिकायला जायची. घरात लाईट नसल्यानं दिव्याच्या उजेडात दिवसरात्र अभ्यास करुन तिनं दहावीत ९१ पॉईंट २० टक्के गुण मिळवले. डॉक्टर होण्याचं स्वप्न ती मनाशी बाळगून आहे. 

तुटपुंजी जिरायती शेती आणि दोन दुभती जनावरं, हेच काय ते या कुटुंबाचं पोटाची खळगी भरण्याचं साधन... दुपारी शाळेतून घरी आल्यावर जनावरांना गवत, कडबाचारा, पाणी पाजणं. आणि सुट्टीच्या दिवशी दुसऱ्‍याच्या शेतात मोलमजुरीनं काम करणं आणि रात्री दिवा लाऊन साडेआठ ते बारा वाजेपर्यंत अभ्यास करणं असा तिचा दिनक्रम होता. 

अत्यंत हलाखीचं आयुष्य जगणाऱ्या जायभाय कुटुंबाची आशा आता राणीवर आहे. तर घरच्या प्रतिकूल परिस्थितीशी धीराची ही राणी लढत आहे. तिला तिच्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी, समाजातल्या संवेदनशील साथीची गरज आहे. 

संघर्षाला हवी साथ

गुणवंतांच्या संघर्षाला 'झी २४ तास'चा मदतीचा हात

तुम्हालाही मदत करायची असल्यास संपर्क करा 

संपर्क क्रमांक : ०२२ - ७१०५५०२६

पत्ता : झी २४ तास, १४ वा मजला, 

ए विंग, मॅरेथॉन टॉवर, 

लोअर परळ, मुंबई - ४०००१३

Read More