Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

समृद्धीचा रिअॅलिटी चेक : वाहत्या 'समृद्धी'त हात धुवून घेणारं गाव!

समृद्धी महामार्गामुळे वाशिम जिल्ह्यातलं एक गाव इतकं समृद्ध झालंय की 'आम्ही २० वर्षं पुढे गेल्याचा' दावा इथले शेतकरी करू लागलेत. जणू आयुष्याचं अंकगणित सुटल्यासारखं इथल्या शेतकऱ्यांना वाटतंय. जिल्ह्यात 'ऑरेंग्ज व्हिलेज' नावानं प्रसिद्ध असलेल्या मुंगळा गावातला हा खास रिपोर्ट...

समृद्धीचा रिअॅलिटी चेक : वाहत्या 'समृद्धी'त हात धुवून घेणारं गाव!

दिनेश दुखंडे, झी मीडिया, वाशीम : समृद्धी महामार्गामुळे वाशिम जिल्ह्यातलं एक गाव इतकं समृद्ध झालंय की 'आम्ही २० वर्षं पुढे गेल्याचा' दावा इथले शेतकरी करू लागलेत. जणू आयुष्याचं अंकगणित सुटल्यासारखं इथल्या शेतकऱ्यांना वाटतंय. जिल्ह्यात 'ऑरेंग्ज व्हिलेज' नावानं प्रसिद्ध असलेल्या मुंगळा गावातला हा खास रिपोर्ट...

वाशिम जिल्ह्यातल्या मुंगळा गावातल्या आनंद नाईक या शेतकऱ्यानं अशीच एक रेष समृद्धी महामार्गासाठी जमिनीच्या सौद्यावर मारली... आणि त्यांच्या आयुष्यातलं अंकगणिताचं कोडं कायमचंच सुटलं... बीए बीएडपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर नाईक कल्याणमध्ये जेमतेम साडे चार हजार रुपये इतक्या तुटपंज्या वेतनावर शिक्षण सेवकाचं काम करत होते. पण काही वेगळं करण्याची त्यांची जिद्द होती... त्यातून ते काही वर्षांपूर्वी आपल्या गावी परतले आणि शेती करायला सुरुवात केली... वीस एकर जागेवर संत्र्याची बाग फुलवली... त्यासाठी पाणी आणलं... खूप कष्ट घेतले...

गावकऱ्यांची 'समृद्धी'

चांगलं उत्पन्नही मिळू लागलं होतं... पण, तेवढ्यात समृद्धी महामार्गाची घोषणा झाली आणि या मार्गात गावातल्या संत्र्याच्या २५० बागांपैकी २१ बागा गेल्या... त्यात आनंद नाईक यांचीही ७ एकर बाग गेलीय... पण त्याचा त्यांना साडे चार कोटींचा घसघशीत मोबदला मिळालाय. अचानक आलेल्या इतक्या पैशांची उधळपट्टी न करता त्यांनी डोकं लावून हा पैसा गुंतवलाय. त्यांची ७ एकर जमीन समृद्धी महामार्गात गेली खरी, पण मिळालेल्या मोबदल्यात त्यांनी गावातच २७ एकर जमीन खरेदी केलीय. मुलांच्या भवितव्याच्या दृष्टीने अकोल्यात ५६ लाखांमध्ये एक प्लॉटही घेतलाय. शेतीसाठी ट्रॅक्टर आणि कामांसाठी आजूबाजूच्या जिल्ह्यात जाण्यासाठी एक बलेरो गाडी विकत घेतलीय. घराच्या दुरूस्तीचं कामही काढलंय... इतकं सगळं घेतल्यानंतरही त्यांच्याकडे अजून दोन कोटी शिल्लक राहिले आहेत... ते त्यांनी बँकेत फिक्स डिपॉसिटमध्ये ठेवलेत. खरा आनंद आता त्यांच्या चेहऱ्यावर दिसू लागलाय.

पैशांचं योग्य नियोजन

आनंद नाईक यांच्याकडून गावातल्या इतर शेतकऱ्यांनीही प्रेरणा घेतलीय. समृद्धी महामार्गामुळे मिळालेल्या पैशाचा त्यांनी योग्य वापर केलाय. मुंगळा गावात समृद्धी महामार्गाला याआधी प्रखर विरोध होता. गावात साधा प्रवेश करणंही शासकीय अधिकाऱ्यांना कठीण जात होतं. कायद्याची जाण असलेले आनंद नाईक हे सुशिक्षित शेतकरी या प्रकल्पविरोधी आंदोलनाचं नेतृत्व करत होते... पण एकेदिवशी सरकारनं पाच पट मोबदला जाहीर केला आणि नाईकही अलगद सरकारच्या गळाला लागले... गावात भूसंपादनाचं पुढचं काम खूप सोपं झालं.

मुंगळा गावात समृद्धी महामार्गाला प्रखर विरोध झाला आणि याच गावानं वेळीच समजूतदारपणा दाखवत विरोध मागेही घेतला... वाहत्या समृद्धीत स्वतःचं भलं करून घेणं म्हणजे काय? ते मुंगळा गावातल्या शेतकऱ्यांकडून शिकावं... 

Read More