Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

संभाजीनगरच्या माजी महापौरांचा बूट चोरीला, तीन कुत्रे ताब्यात; CCTV फुटेजवरुन कारवाई

Crime News: संभाजीनगरमध्ये (Sambhajinagr) माजी महापौरांचा हरवलेला बूट शोधण्यासाठी थेट महापालिका यंत्रणाच कामाला लावण्यात आल्याची अजब घटना समोर आली आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये एका कुत्र्याने बूट नेल्याचं कैद झालं होतं. यानंतर श्वान पकडणाऱ्या पथकाने सीसीटीव्हीत दिसणाऱ्या तिन्ही कुत्र्यांना पकडलं.   

संभाजीनगरच्या माजी महापौरांचा बूट चोरीला, तीन कुत्रे ताब्यात; CCTV फुटेजवरुन कारवाई

Crime News: सर्वसामान्यांची एखादी वस्तू चोरीला गेल्यानंतर कासवाच्या गतीने तपास करणारं प्रशासन जेव्हा एखाद्या मोठ्या पदावरील व्यक्तीकडून तक्रार आल्यावर किते वेगाने काम करतं याचा प्रत्यय नुकताच आला आहे. बरं जी वस्तू चोरीला गेली ती काही मौल्यवान वस्तूही नव्हती. चक्क बूट चोरीला गेल्याने महापालिका यंत्रणा कामाला लागली होती. संभाजीनगरमध्ये हा प्रकार घडला आहे. इतकंच नाही तर सीसीटीव्हीत ज्या कुत्र्यांनी हा बूट नेल्याचं दिसत होता, त्यांना श्वान पथकाने पकडून ताब्यातही घेतलं होतं. हे वृत्त समोर आल्यानंतर नागरिकांमध्ये चांगलीच चर्चा रंगली आहे. 

नेमकं काय झालं?

छत्रपती संभाजीनगरमध्ये माजी महापौर नंदकुमार घोडेले यांचा 15 हजारांचा बूट त्यांच्या घराच्या दारासमोरून मोकाट कुत्र्याने पळवला होता. माजी महापौरांचा बूट कुत्र्याने पळवल्यानंतर त्या कुत्र्याला शोधण्यासाठी महानगरपालिकेची यंत्रणाच कामाला लागली होती. सीसीटीव्हीत घरात घुसलेल्या दोन कुत्र्यांनी बूट पळवल्याचं कैद झालं होतं. सीसीटीव्हीच्या आधारे श्वान पकडणाऱ्या पथकाने तीन कुत्र्यांना पकडल्यानंतर नेमका बूट कोणत्या कुत्र्याने चोरला हे मात्र गुलदस्त्यातच राहिलं. 

माजी महापौर नंदकुमार घोडेले यांचे इटखेडा भागात निवासस्थान आहे. शनिवारी रात्री ते घरी आले. नेहमीप्रमाणे आपला बूट दारासमोर काढला व ते झोपी गेले. सकाळी त्यांना आपला बूट गायब झाला असल्याचं लक्षात आलं. त्यामुळे त्यांनी शोधाशोध सुरू झाली. त्यांनी सीसीटीव्ही तपासलं असता घराच्या आवारात आलेल्या भटक्या कुत्र्याने बूट उचलून नेल्याचं उघड झालं. सीसीटीव्हीत दिसत आहे त्यानुसार यावेळी एकूण तीन कुत्रे होते. 

सीसीटीव्ही पाहिल्यानंतर बूट कुत्र्याने नेल्याचं उघड झालं होतं. यामुळ नंदकुमार घोडेले यांनी महापालिकेच्या पशुसंवर्धन विभागाला फोन करून परिसरात मोकाट श्वान वाढले असून, त्यांचा बंदोबस्त करावा, अशी सूचना केली. तसंच श्वानाने आपला बूट पळवून नेल्याचं सांगितलं. यानंतर महापालिका यंत्रणा तात्काळ कामाला लागली. 

फोन केल्यानंतर काही वेळातच श्वान पकडणारी गाडी इटखेडा भागात आली. त्यांनी मोकाट कुत्र्यांचा शोध घेत तीन कुत्र्यांना पकडलं. पण पकडलेल्या तीन कुत्र्यांपैकी बूट कोणत्या कुत्र्याने उचलला होता हे काही कळत नव्हतं. त्यामुळे इतके प्रयत्न करुनही महापौरांचा बूट काही सापडला नाही. नंतर या तिन्ही कुत्र्यांना कोंडवाड्यात पाठवण्यात आलं.

Read More