Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

सातारा कोल्हापूर जिल्ह्यातील घाटमाथ्यावर रेड अलर्ट; पाऊस धुमशान घालणार

सातारा कोल्हापूर जिल्ह्यातील घाटमाथ्यावर रेड अलर्ट जारी करण्यात आली आहे.  हवामान विभागानं मुंबईला ऑरेंज अलर्ट दिला आहे. 

सातारा कोल्हापूर जिल्ह्यातील घाटमाथ्यावर रेड अलर्ट; पाऊस धुमशान घालणार

Maharashtra Rain Alert :  मुंबईसह सातारा कोल्हापुरातही मुसळधार पावसाची शक्यता आहे. सातारा कोल्हापूर परिसरातील घाटमाथ्यावर रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुढील काही तास मुंबईसह उपनगरांत पाऊस थैमान घालणार आहे. हवामान विभागानं मुंबईला ऑरेंज अलर्ट दिला आहे. मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रातही जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. हवामान विभागाचे प्रमुख के.एस. होसाळीकर यांनी ही माहिती दिलीये.

मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता

पुढील 24 तासात मुंबई शहर आणि उपनगरात मध्यम ते मुसळधार तर काही ठिकाणी अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पालघर, ठाणे, मुंबई, रायगड जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्गला रेड अलर्ट घोषित करण्यात आला आहे.  पुणे आणि सातारा जिल्ह्यासाठी ही हवामान खात्याचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. 

पुढील 24 तासात पश्चिम विदर्भातील अकोला,अमरावती, यवतमाळसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. नागपूर हवामान विभागानं हा अलर्ट जारी केलाय. या भागात मुसळधार किंवा अतिवृष्टी होण्याची शक्यताही वर्तवली आहे. तर बुलढाणा आणि नागपूरच्या काही भागातही मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलीये. तर, विदर्भातील इतर जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केला आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला

मध्यरात्रीपासून पाऊस थांबल्यामुळे जिल्ह्यातील पूर परिस्थिती नियंत्रणात आलीय. मात्र जिल्ह्यातील सर्वच नद्या अद्यापही इशारा पातळीवर आहेत. काजळी अर्जुना कोदावली, शास्त्री , मुचकुंदी  नद्या इशारा पातळीवर आहेत. हवामान विभागाने आज जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट दिलाय. जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली.

जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली 

गेल्या दोन दिवसांपासून कोसळणा-या पावसामुळे खेड शहरातल्या जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे.. त्यामुळे खेड शहरावर पुराचं संकट येण्याची भीती आहे.. पुराचा धोका लक्षात घेता आपत्ती व्यवस्थापन टीम सज्ज ठेवण्यात आलीय. तसंच  खेड नगरपालिका, पोलीस प्रशासन आणि तालुका प्रशासनही हाय अलर्टवर आहे.. खेडचे तहसीलदार सुधीर सोनवणे यांनी जगबुडी नदीकिनारी असलेल्या अलसुरे गावाला भेट देवून पाहणी केली. पावसाचा जोर कायम राहिल्यास शहरात पाणी भरण्यास सुरुवात होईल अशी भीती खेडच्या नागरिकांना सतावतेय..

गोव्यात मुसळधार पावसाचा अलर्ट जारी करण्यात आलाय. या पार्श्वभूमीवर गोव्यात 8 जुलैपर्यंत शाळा बंद ठेवण्याचे आदेश प्रशासनाकडून देण्यात आलेत. सुरक्षेच्या दृष्टीनं हा निर्णय घेण्यात आलाय.  

Read More