Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

राज ठाकरे, बच्चू कडू आणि जलील; भावी मुख्यमंत्र्यांच्या पोस्टर्सची चर्चा

राज्यात सध्या अनेक भावी मुख्यमंत्र्यांचे पोस्टर्स लागलेत. राज ठाकरे, बच्चू कडू आणि इम्तियाज जलील यांचीही नावं मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आली आहेत.

राज ठाकरे, बच्चू कडू आणि जलील; भावी मुख्यमंत्र्यांच्या पोस्टर्सची चर्चा

Maharashtra Politictics : विधानसभा निवडणुकीचे वारे जोरदार वाहतायत. कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष तर लागलंय. मात्र  राज्यात भावी मुख्यमंत्र्यांची यादीही वाढतच चाललीय. आता तर थेट राज ठाकरे, बच्चू कडू आणि इम्तियाज जलील यांची नावं मुख्यमंत्रीपदाच्या रांगेत आलीयेत. संभाजीनगरसह बीडमध्ये मनसे, MIM आणि प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केलेली बॅनरबाजी सध्या चर्चेचा विषय ठरतीय.  

बीड दौ-यावर असलेल्या राज ठाकरेंच्या स्वागतासाठी माजलगावात बॅनरबाजी करण्यात आलीय. या बॅनरवर राज ठाकरेंचा भावी मुख्यमंत्री असल्यानं विविध चर्चा सुरू झाल्यात. बच्चू कडू हे आक्रमक नेते म्हणून ओळखले जातात. दिव्यांगांसाठी आक्रमक भूमिका घेऊन लढा देणारे बच्चू कडू कायम चर्चेत असतात. आता त्यांचंही नाव मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आलंय. संभाजीनगरात बच्चू कडूंच्या आक्रोश मोर्चादरम्यान प्रहार संघटनेनं जोरदार बॅनरबाजी केलीय. बच्चू कडूंचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख असणाऱ्या या बॅनरबाजीनं सर्वांचंच लक्ष वेधून घेतलंय. 

MIMच्या कार्यकर्त्यांनी माजी खासदार इम्तियाज जलील यांचा वाढदिवस जल्लोषात साजरा केला. जलील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना कार्यकर्त्यांनी भावी मुख्यमंत्री अशी बॅनरबाजी केलीय..त्यामुळं जलील यांनाही मुख्यमंत्रीपदाचे वेध तर लागले नाहीत ना, अशी चर्चा सुरू झालीय.

आपल्या नेत्यानं मुख्यमंत्री व्हावं अशी प्रत्येक कार्यकर्त्याची इच्छा असते. राज्याच्या राजकारणात मुख्यमंत्रीपदासाठी रांगेत असलेल्यांची यादी खूप मोठी आहे. यापूर्वी अजित पवार, देवेंद्र फडणवीस, पंकजा मुंडे, नाना पटोले, जयंत पाटील, उद्धव ठाकरे, जितेंद्र आव्हाड यांच्याही समर्थकांनी भावी मुख्यमंत्री नेत्यांचे बॅनर्स झळकवले आहेत. त्यामुळं राज्यात उदंड जाहले भावी मुख्यमंत्री अशीच परिस्थिती निर्माण झालीय.

Read More