Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

पश्चिम महाराष्ट्रासहीत रायगडात मुसळधार, अनेक रस्ते पाण्यात

साताऱ्यातील शिरताव गावाच्या नदीवरील पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे तालुक्यातील ३५ गावांचा संपर्क तुटलाय

पश्चिम महाराष्ट्रासहीत रायगडात मुसळधार, अनेक रस्ते पाण्यात

मुंबई : परतीच्या पावसानं पश्चिम महाराष्ट्रासहीत रायगडमध्ये धुमाकूळ घातलाय. वाहतुकीचे अनेक मुख्य रस्ते पाण्याखाली गेलेले दिसत आहेत. त्यामुळे प्रवाशांचाही खोळंबा झालेला पाहायला मिळतोय. पुण्यात रात्री झालेल्या पावसामुळे दाणादाण उडवून दिलीय. शहर परिसरातील ओढ्या नाल्यांना पूर आलाय. अनेक ठिकाणी रस्त्यावर तसेच वस्त्यांमध्ये पाणी शिरलय. वाहनांनाही पाण्याचा वेढा पडलाय. काही ठिकाणी झाडे कोसळली आहेत.

साताऱ्यात ३५ गावांचा संपर्क तुटला

सातारा जिल्ह्यातील दुष्काळी पट्यात सलग दोन दिवस परतीच्या पावसानं दमदार हजेरी लावलीय. माण, खटाव, फलटण, कोरेगाव तालुक्याला झोडपून काढलंय. रात्री उशिरा जोरदार पाऊस पडत असल्यानं अनेक ठिकाणी नद्या, ओढे, नाले दुथडी भरून वाहतायत. या भागातील सिमेंट बंधारे भरुन वाहू लागलेत. खटाव तालुक्यातील नेर तलाव रात्री झालेल्या पावसाने पूर्ण क्षमतेने भरलाय. कुळकजाई इथून उगम पावणाऱ्या माणगंगा आणि बाणगंगा या दोन्ही नद्यांना पूर आलाय. बाणगंगा नदीमुळे दहिवडी फलटण शहराचा संपर्क तुटलाय. परतीच्या पावसामुळे दुष्काळी भागातील बळीराजाला काहीसा दिलासा मिळालाय. कायम दुष्काळी भाग असलेल्या या तालुक्यांमध्ये पावसाने हजेरी लावल्याने बळीराजा सुखावलाय. या तालुक्यात पिण्यासाठी पाण्याचे टँकर चालू होते, जनावरांसाठी चारा छावण्या सुरु आहेत. असं असताना रात्रीपासून सुरु असणाऱ्या मुसळधार पावसामुळे या भागातल्या लोकांना दिलासा मिळालाय. शिरताव गावाच्या नदीवरील पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे तालुक्यातील ३५ गावांचा संपर्क तुटलाय.

गुहागर-विजापूर महामार्ग ठप्प

सांगलीत कडेगाव तालुक्यात मुसळधार पाऊस झालाय. हणमंतवाडिया इथल्या नांदणी नदीवरील पूल पहिल्यांदाच पाण्याखाली गेलाय. त्यामुळे गुहागर-विजापूर महामार्ग गेल्या दोन तासांपासून वाहतुकीसाठी बंद आहे. खानापूर तालुक्यातल्या येरळा नदीला आणि ओढ्याला पूर आलाय. भाळवणी - शिरगाव रोडवरच्या येरळा नदीवरचा पूल पाण्याखाली गेलाय.

रायगडातील भातशेती धोक्यात

रायगड जिल्ह्यात परतीच्या पावसाने हजेरी लावली आहे. जिल्ह्याच्या सर्वच भागात पावसाची रिपरिप सुरू आहे. आकाश ढगाने भरून आलं आहे. अधून-मधून ढगांचा गडगडाट आणि विजांच्या लखलखाटासह जोरदार सरी कोसळत आहेत. अनेक भागातील वीजपुरवठा खंडीत झाला आहे. दाणा भरलेल्या स्थितीत असलेल्या भातपिकाला मात्र हा पाऊस धोकादायक ठरू शकतो त्यामुळे शेतकरी चिंतातूर आहे.

चंद्रपूरमध्ये जनजीवन विस्कळीत

चंद्रपूर शहरवासियांची आजची सकाळ मुसळधार पावसानं उजाडली. शहर-जिल्ह्यात परतीचा मुसळधार पाऊस बरसतोय. सकाळपासून हा जोरदार पाऊस नागरिकांची दैना करून गेलाय. शहरालगतचे इरई धरण पूर्ण क्षमतेनं भरल्यानं दोन दरवाजे उघडण्यात आलेत. पाऊस असाच बरसत राहिल्यास विसर्ग वाढण्याची शक्यता वर्तविली जातेय. सकाळपासून बरसत असलेल्या मुसळधार पावसानं जनजीवन विस्कळीत झालंय. या पावसाचा सोयाबीन आणि कपाशीच्या पिकांना जोरदार फटका बसणार असून पावसाच्या गतीनं नुकसानीत वाढ होण्याची शक्यता आहे.

लातूर मात्र कोरडाच

लातूर जिल्ह्यात अजूनही म्हणावा तसा पाऊस झालेलाच नाही. पण जाता जाता पावसानं दमदार हजेरी लावली. लातूर, निलंग्यासह अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. लातूर जिल्ह्याची पावसाची सरासरी ही ८०२ मिमी इतकी असून आतापर्यंत ५०० मिमीच्या वर पाऊस सरकलेला नाही. त्यात सर्वाधिक कमी पाऊस हा लातूर तालुक्यात ३०० मिमी पेक्षा कमी झाला आहे. बीड, उस्मानाबाद जिल्ह्याच्या सीमेवरच्या मांजरा धरण क्षेत्रात अद्यापही समाधानकारक पाऊस झाला नाही. त्यामुळे १ नोव्हेंबरपासून शहरात टँकरनं पाणी पुरवठा होणारय. त्यामुळे मांजरा धरण क्षेत्रात पावसानं आतातरी दमदार एन्ट्री मारावी आणि पाणीसंकट दूर करावं, अशी अपेक्षा लातूरकर व्यक्त करतायत. 

Read More