Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

Video : मास्क नाही म्हणून हटकलं; त्यानं ट्रॅफिक पोलिसाला फरपटत नेलं

जो प्रकार घडला तो धक्कादायक होता. 

Video : मास्क नाही म्हणून हटकलं; त्यानं ट्रॅफिक पोलिसाला फरपटत नेलं

पुणे : कोरोना व्हायरसच्या corona virus पार्श्वभूमीवर काही नियमांचं सक्तीनं पालन करण्याचं आवाहन करण्यात येत आहे. असं असलं तरीही अनेकदा या नियमांची पायमल्ली करत नागरिक मनमर्जी करताना दिसत आहेत. अशा नागरिकांनाच हटकल्याप्रकरणी एका वाहतूक पोलिसाला काही अडचणींचा सामना करावा लागल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली. 

ऑन ड्युटी अर्थात आपलं कर्तव्य बजावत एका वाहतूक पोलिसानं पुण्यातील पिंपरी येथे एका कारमधील व्यक्तींना Mask मास्क न लावल्यामुळं हटकलं. ज्यानंतर जो प्रकार घडला तो धक्कादायक होता. कारण, कारमधील व्यक्तींना हटकणाऱ्या त्या पोलिसाला कारचालकानं कारच्या बोनेटवरुन फरपटत नेलं. 'एएनआय' या वृत्तसंस्थेनं यासंदर्भातील एक व्हिडिओ प्रसिद्ध केला. या व्हिडिओमध्ये चालत्या कारच्या बोनेटवरुन पोलिसांना फटपटत नेलं जात असल्याचं स्पष्टपणे पाहता येत आहे. 

मास्क न घालता दंड देण्यास टाळाटाळ करणाऱ्या आणि पोलिसांना अशी वागणूक देणाऱ्य़ा कार चालकाला अटक करण्यात आली आहे. 

चिंचवड पोलीस स्थानकात दाखर करण्यात आलेल्या तक्रारीनुसार या भागातील वाहतूक पोलीस हे त्याचं कर्तव्य बजावत होते. रस्त्यावरुन जाणाऱ्या वाहनांमध्ये असणाऱ्या प्रवाशांनी मास्क घातला आहे की नाही, यावर ते लक्ष ठेवून होते. 

 

आबासाहेब सावंत असं या सर्व प्रकाराला बळी पडलेल्या वाहतूक पोलिसांचं नाव आहे. सदर घटनेमध्ये त्यांच्या पायाला दुखापत झाल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, या घटनेनंतर मोटर वेहिकल कायद्यान्वये युवराज हनुवते (४९) याच्यावर कलम ३०७, ३५३, ३२३, २७९ आणि २४ (a) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, या घटनेनंतर पुन्हा एकदा कायदा आणि सुव्यवस्था राखू पाहणाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न डोकं वर काढून गेला आहे. 

Read More