Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

इंद्रायणी भाताच्या बोगस बियाणांची विक्री, शेतकरी देशोधडीला... एका झटक्यात होत्याचं नव्हतं झालं

Bogus Seeds of Indrayani Rice : बोगस बियाणांचं लोण आता पुणे जिल्ह्यातही पसरलंय. मावळमध्ये चक्क इंद्रायणी भाताचं बोगस बियाणं विकण्यात आलं. त्यामुळं शेतक-यांचं लाखो रुपयांचं नुकसान कसं झालं असून गरीब शेतकरी देशोधडीला लागला आहे. 

इंद्रायणी भाताच्या बोगस बियाणांची विक्री, शेतकरी देशोधडीला... एका झटक्यात होत्याचं नव्हतं झालं

चैत्राली राजापूरकर, झी मीडिया, मावळ : सुजलाम सुफलाम मावळ तालुका म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातलं (Western Maharashtra) भाताचं आगार  मात्र या भाताच्या आगारातही आता बोगस बियाण्यांचा (Bogus Seeds) सुळसुळाट झालाय. मावळच्या कुसगाव पमा गावातल्या शेतकऱ्यांनी महाबीजचं इंद्रायणी तांदळाचं (Indrayani Rice) बीज शेतात पेरलं. मात्र भाताची लागवड होऊन त्याला फुटवे फुटायला लागल्यावर हे बीज निकृष्ट असल्याचं आढळलं. त्यामुळे लाखो रुपये खर्च करून वाढवलेलं पीक एका झटक्यात होत्याचं नव्हतं झालं. धक्कादायक बाब म्हणजे याबाबतचे पंचनामे होऊनही बोगस बियाणं विकणाऱ्यांवर अद्याप कारवाई होत नाहीय.

तब्बल 10 एकर मध्ये घेतलेल्या पिकांचे नुकसान हे केवळ बोगस बियाणांमुळे झाल्याचा आरोप शेतकऱ्यांनी (Farmers) केला आहे.  अशा बोगस बियाणे विक्री करणाऱ्या आणि त्यांच्याविरुद्ध कारवाई न करणाऱ्या कृषी अधिकारी आणि दोषी असलेल्यांवर कारवाई करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे

याबाबत झी 24 तासनं बियाणे विक्रेत्यांशी संपर्क साधला तेव्हा त्यांनी महाबीजकडे बोट दाखवून सरळसरळ हात वर केले. शेतकऱ्यांची तक्रार घेऊन कृषी अधिकाऱ्यांकडे मांडली. तेव्हा चौकशी सुरू असल्याचं ठोकळेबाज उत्तर त्यांनी दिलं. तालुका कृषी अधिकारी यांच्यासह पंचायत समिती आणि काही भात संशोधक यांच्या टीमने शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली. त्यानंतर त्याचे सॅम्पल घेऊन हे सर्व Sample संशोधनासाठी पाठविण्यात आले आहे. त्याबाबत अहवाल शेतकऱ्यांना देण्यात येणार असून भरपाई साठी ग्राहक कोर्टातुन शेतकऱ्यांना न्याय मिळेल. या अहवालानंतर जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल असे कृषी अधिकारी दत्तात्रय पडवळ यांनी सांगितलं आहे.

बोगस बियाण्याच्या विक्रीमुळं अनेक गरीब शेतकरी देशोधडीला लागलेत. महाबीजसारखं सरकारी बियाणं देखील बोगस निघणार असेल तर शेतकऱ्यांनी कुणाच्या तोंडाकडं पाहायचं? अशा बोगस बियाणं विकणाऱ्यांवर सरकार तातडीनं कारवाई करणार की नाही? हा खरा सवाल आहे.. 

काय आहे इंद्रायणी भाताचं वैशिष्ट्य?
पुणे जिल्ह्यातल्या मावळ भागातून इंद्रायणी नदी वाहते. त्यामुळेच इथल्या सुवासिक भाताला इंद्रायणी हे नाव पडलं. वडगावच्या भात संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. शंकरराव कळके यांनी 1987 मध्ये आय.आर 8 आणि आंबेमोहर या दोन जुन्या भात वाणांचा संकर केला आणि यातून इंद्रायणी वाण तयार झालं. उत्तम प्रतीचा, चिकट आणि चवदार तांदूळ म्हणून इंद्रायणीची ओळख निर्माण झाली आहे. 

Read More