Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

पुणे अपघात प्रकरणात पोराला वाचवण्यासाठी बापाचे प्रताप, 2 तासांमध्ये डॉ. तावरेला 14 कॉल्स

Pune Porsche Accident : पुण्यातल्या ससून रुग्णालयाच्या डॉक्टर्सनी अल्पवयीन आरोपीच्या रक्ताचे नमुने बदलले. मात्र हे सर्व झालं ते फोन कॉलवर. आता पोलिसांनी कॉल रेकॉर्ड शोधून काढत यामागच्या आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत.

पुणे अपघात प्रकरणात पोराला वाचवण्यासाठी बापाचे प्रताप, 2 तासांमध्ये डॉ. तावरेला 14 कॉल्स

Pune Porsche Accident : 19 मे 2024... पुण्याच्या कल्याणीनगर भागात पोर्श कार दोघांना चिरडते. या कारमधल्या अल्पवयीन आरोपीला जमाव चोप देतो.. त्याला अटक होते. मात्र अपघाताआधी या पोराने बारमध्ये 75 हजार रुपयांचं बिल केलं होतं. दारु ढोसून तो कार चालवत होता. मग या लाडाच्या पोराच्या बड्या बापाने आपला पैशांची मस्ती दाखवायला सुरुवात केली.  आपल्या पोराचं ब्लड सॅम्पल (Blood Sample) कुठे तपासलं जाणार हे या विशाल अग्रवालला (Vishal Agrawal) माहिती होतं. त्यानं ससून रुग्णालयाच्या डॉ. अजय तावरेंना (Dr. Ajay Taware) फोन फिरवला. हा तोच डॉ. तावरे आहे ज्याच्यावर याआधीही आरोप झाले होते. 19 मे रोजी सकाळी 11 वाजता ससून हॉस्पिटलमध्ये अल्पवयीन मुलाच्या रक्ताचे नमुने गोळा करण्यात आले, आणि मग तावरेंनी आपला प्लॅन अंमलात आणला. त्याने अल्पवयीन आरोपीच्या मुलाचे ब्लड सॅम्पलच बदलले.

2 तासांमध्ये डॉ. तावरेला 14 कॉल्स
अल्पवयीन आरोपीचा बाप विशाल अग्रवालने 19 मे रोजी तावरेला 14 कॉल केले. सकाळी 9 ते 11 या वेळेत दोघांमध्ये तब्बल 14 वेळा संभाषण झालं. विशाल अग्रवाल आणि तावरेचं कॉल, व्हॉट्स अॅप आणि फेसटाईमच्या माध्यमातून संभाषण झालं. याच कॉलनंतर तावरेने आपल्या पदाचा दुरुपयोग करत आरोपीच्या रक्ताचे नमुने बदलले. आता या दोघांमध्ये नेमकं काय बोलणं झालं? त्यात अग्रवाल काय बोलले, तावरेंनी काय उत्तर दिली? तावरेसोबत विशाल अग्रवाल कसे जोडले गेले? अग्रवाल-तावरेमध्ये मध्यस्थी करणारा दुसरा कोणी होता का? याचा तपास आता पोलीस करतायत

पुण्यात ब्लड सॅम्पल बदलण्यामागे बड्या धेंड्याचे हात कसे वरपर्यंत पोहोचले आहेत हेच दिसून आलंय.. बड्या धेंड्यांसाठी यंत्रणा कशी हलते. फोनवरच्या संभाषणानंतर पुरावे कसे नष्ट केले जातात. पुरावे कसे बदलले जातात. याचं हे ज्वलंत उदाहरण म्हणता येईल.

डॉ. तावरे मास्टरमाईंड
आरोपीचे हे ब्लड सॅम्पल बदलण्याचा कटाचा मास्टरमाईंड दुसरा तिसरा कोणी तर ससूनचा डॉक्टर तावरेच असल्याचं समोर आलंय. अल्पवयीन आरोपीच्या बापाने म्हणजेच विशाल अग्रवालने तावरेला फोन केले आणि त्यानंतरच तावरेने ब्लड सॅम्पल बदलण्याचे प्रताप केले. तीन लाखांमध्ये हे सर्व काही घडवून आणल्याचं पोलिसांच्या तपासामध्ये निष्पन्न झालं.  मात्र या सर्व व्यवहारांमध्ये कोट्यवधींची डील झाल्याचा संशय पोलिसांना आहे. 

पुरावे नष्ट करण्याच्या हेतूने अजय तावरेच्या जीविताला धोका असल्याचा दावा ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंनी केलाय. अजय तावरेला मंत्रालयाच्या सहाव्या मजल्याचं संरक्षण आहे.. तावरे, सापळे आणि चंदनवालेंचा मंत्रालयाच्या सहाव्या मजल्याचा संबंध काय?  असा सवालही सुषमा अंधारेंनी केलाय.

ब्लड सॅम्पल बदलण्याचा कट डॉ. अजय तावरेने रचला आणि तो अंमलातही आणला. मात्र सुषमा अंधारेंनी आरोप केलेला मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरील 'तो' कोण आहे? सुषमा अंधारेंच्या दाव्यानुसार पोर्श कार प्रकरणाचे धागेदोरे सत्ता बदलापर्यंत आहेत. तेव्हा यातला खरा मास्टरमाईंड कोण हे सत्य समोर आलंच पाहिजे.

Read More