Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

Pune News :आयडीयाची कल्पना! ना लोडशेडिंग, ना लाईट बिलाचा त्रास... पुण्यातल्या 'या' गावात 24 तास उजेड

Solar village : पुण्याच्या मावळ तालुक्यातील या गावाची सध्या देशभरात चर्चा आहे. एमटीयू आणि रोल्स रॉयल्स या विदेशी कंपन्यांनी कोट्यवधी रुपयांचा निधी दिल्याने गावात आता मोठा सोलार प्रकल्प उभा राहिला आहे. त्यामुळे आता गावात 24 तास लख्ख प्रकाश असणार आहे.

Pune News :आयडीयाची कल्पना!  ना लोडशेडिंग, ना लाईट बिलाचा त्रास... पुण्यातल्या 'या' गावात 24 तास उजेड

चैत्राली राजापुरकर, झी मीडिया, पुणे : ग्रामीण भागातील सर्व यंत्रणा महावितरणच्या (Mahavitran) मर्जीने चालत असल्याचे आपण अनेकदा पाहिलं असेल. कारण आठ ते बारा तास ग्रामीण भागातील बत्ती गुल असते. त्यामुळे शेतकरी, विद्यार्थी,आणि कामगार वर्गाला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. तर महिलांची सुद्धा पाण्यासाठी वणवण होत असते. सतत लाईट (electricity) जात असल्याने अनेक ग्रामीण भागातील यंत्रणा ठप्प होतात. मात्र मावळातील पुसाणे गाव हे या सर्व त्रासापासून आता मुक्त होणार आहे. सोलार एनर्जीमुळे लोडशेडिंगच्या त्रासातून पुसाने गाव आता पूर्णपणे मुक्त होणार आहे.

मावळ तालुक्यातील पुसाणे गाव आहे देशातील एकमेव गाव आहे जे आता फक्त सोलर सिस्टीमवर चालणार आहे. एका नामांकित विदेशी कंपनीने तालुक्यातील पुसाणे गावाची निवड करून भव्यदिव्य सोलर सिस्टीम प्रकल्प उभा केला आहे. त्यामुळे आता गावातील लाईट 24 तास सुरू राहणार आहे. या सोलर सिस्टीममुळे रस्त्यावरील लाईट, ग्रामपंचायत कार्यालय, मंदिर, शाळा, पिण्याचे पाणी उपसाकेंद्र करण्यासाठी लागणाऱ्या मोटारी चालणार आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील महिलांना हंडाभर पाण्यासाठी कोसो दूर जाण्याची गरज भासणार नाही.

या सोलर सिस्टीममुळे गावात 24 तास लाईट असणार आहे. दीड हजार लोकसंख्या असलेल्या पुसाणे गावाने या प्रकल्पासाठी 20 लाख रुपयांचा खर्च केला आहे. तर एमटीयू आणि रोल्स रॉयल्स या विदेशी कंपन्यांनी कोट्यवधी रुपयांचा निधी सोलर सिस्टीम प्रकल्पावर खर्च केला आहे. केवळ सोलर सिस्टीमच नव्हे तर बॅटरी आणि जनरेटर बॅकअप देखील या प्रकल्पात देण्यात आला आहे. त्यामुळे आता पुसाणे गाव आणि ग्रामस्थ लोड शेडिंगच्या त्रासातून मुक्त होणार आहेत.

या सोलर सिस्टीम प्रकल्पामुळे शेतकऱ्यांना शेतात पाणी सोडणे सोपे होणार आहे. तर विद्यार्थी आता अभ्यासापासून वंचित राहणार नाहीत. यासोबत महिलांची पाण्याची वणवण देखील थांबणार असल्याने पुसाणे गावाचं नंदनवन होणार असल्याने ग्रामस्थांचे म्हणणे आहे. यामुळे गावात आनंदाचे वातावरण दिसून येत आहे.

दरम्यान, ओडिशातील कोणार्क हे असे पहिले शहर आहे, जे पूर्णपणे सौर उर्जेवर चालत आहे. आता मध्य प्रदेशातील सांची शहर देखील आता पूर्णपणे सोलावर चालणार आहे. गुरुवारी या प्रकल्पाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. त्यामुळे आता सोलार सिटीच्या निर्मितीमुळे सांची येथे वीजपुरवठा सुरळीत होणार आहे. यासाठी एकूण 75 कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे.

Read More