Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

'शेतातलं पाणी NASA 40 हजार कोटींना विकत घेणार' म्हणत पुणेकरांना लाखो रुपयांचा गंडवलं; आरोपी दाम्पत्य फरार

Pune Crime : पुण्यात वृद्ध दाम्पत्याच्या फसवणुकीचे अजब प्रकरण समोर आले आहे. पोलीस सध्या आरोपी दाम्पत्याचा कसून शोध घेत आहेत. दुसरीकडे कोणीही अशा प्रकारच्या फसवणूकीला बळी पडू नका असे आवाहनही पीडित दाम्पत्याने केले आहे.

'शेतातलं पाणी NASA 40 हजार कोटींना विकत घेणार' म्हणत पुणेकरांना लाखो रुपयांचा गंडवलं; आरोपी दाम्पत्य फरार

सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे : सध्या सोशल मीडियावरुन तसेच ऑनलाईन फसवणुकीच्या (Online Fraud) प्रकरणांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. विविध प्रकारचे आमिष दाखवून नागरिकांची फसवणूक होत आहे. असाच काहीसा प्रकार पुण्यात (Pune Crime) घडला आहे. शेतात वीज पडल्यानंतर एक द्रव्य तयार झाले असून ते नासा (NASA) विकत घेणार आहे. ते विकत घेण्यासाठी गुंतवणूक करा आणि त्यातून दहापट रक्कम मिळवा असं आमिष पुण्यातील एका वृद्ध दाम्पत्याला आरोपीनं दाखवलं आणि त्यांना लाखो रुपयांना गंडा घातला आहे. शेतामध्ये सापडलेलं द्रव्य सॅटेलाइट मध्ये वापरले जाते आणि ते नासा विकत घेणार आहे, असे आरोपीने सांगितले होते.

या सगळ्या प्रकाराबाबत शशीरेखा प्रभाकर महिंद्रकर (वय 65) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. तक्रारीवरुन त्यावरून पोलिसांनी सतीश धुमाळ आणि वैशाली सतीश धुमाळ (रा.मॅजेस्टिक नेस्ट फुरसुंगी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दोन्ही आरोपींचा शोध सुरु केला आहे.

नेमकं काय झालं?

याबाबत अधिक माहिती अशी शशीरेखा प्रभाकर महिंद्रकर आणि पती प्रभाकर महिंद्रकर हे फुरसुंगी येथील अक्वा मॅजेस्टिक याठिकाणी राहायला आहेत. वर्षभरापूर्वी त्यांच्या सोसायटीमध्ये सहाव्या मजल्यावर सतीश धुमाळ राहायला आले होते. हळूहळू महिंद्रकर कुटुंबियांची त्यांच्याशी ओळख झाली. एका दिवशी सतीश धुमाळ आणि त्यांची पत्नी वैशाली धुमाळ फिर्यादी शशीरेखा यांच्या घरी आले. त्यांनी सांगितले की केरळ राज्यातील मुन्नर जिल्ह्यात एका शेतात वीज पडून त्यामध्ये आम्हाला एक द्रव सापडला आहे. तो द्रव पदार्थ सॅटेलाइटमध्ये वापरला जातो. तो अमेरिकी अंतराळ संशोधन संस्था नासा 40 हजार कोटीला विकत घेते आहे. ते द्रव्य मी विकत घेणार आहे. पण जो कोणी यामध्ये गुंतवणूक करेल त्याला दहापट रक्कम मिळू शकते, असे आरोपींनी सांगितले.

त्यानंतर आरोपींनी महिंद्रकर दाम्पत्याकडून 1 लाख 65 हजार रुपये घेतले. "जेव्हा जेव्हा आम्ही आमच्या पैशाबाबत विचारत होतो तेव्हा आम्हाला घरात घुसून मारहाण केली. आरोपींनी आम्हाला पैसे देण्यास टाळाटाळ केली. आरोपी सतीश मिसाळ यांनी फक्त आमचीच नाही तर अनेक लोकांची अशीच लाखोंची फसवणूक केली आहे. एवढंच नव्हे तर लोकांनी सोनं गहाण ठेवून त्याला लाखो रुपये दिले आहेत. पण त्याने कोणाचेही पैसे दिलेले नाही. आम्ही तर आमच्या घराची कागदपत्रे देखील त्याला दिली आहेत. ती सुद्धा त्याने परत केलेली नाहीत. त्यामुळे जशा पद्धतीने आमची फसवणूक झाली तसे कोणीही याला बळी पडू नये," असे वृद्ध दाम्पत्याने सांगितले. 

Read More