Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

क्यूएस आणि डेस्क ऍपच्या माध्यमातून पेटीएमच्या ग्राहकांना गंडा

नागरिकांनो सावधान.... अन्यथा बँकेतील पैसे असे होतायंत गायब

क्यूएस आणि डेस्क ऍपच्या माध्यमातून पेटीएमच्या ग्राहकांना गंडा

कपिल राऊत, झी मीडिया, ठाणे : ऑनलाइन फसवणुकीसाठी सायबर गुन्हेगार वेगवेगळ्या क्लृप्त्या लढवतात. आता तर 'क्यूएस' ऍपच्या माध्यमातून नागरिकांना गंडा घातला जातो आहे. गेल्या दहा दिवसांत ठाणे, डोंबिवलीतील सात जणांची फसवणूक झाली आहे. ऑनलाईन सायबर गुन्ह्यात वाढ होत आहे. क्यूएस किंवा डेस्क ऍप डाऊनलोड करत असाल तर सावध व्हा.

नागरिकांनी सजग राहण्याची गरज

पेटीएमच्या केवायसीसंदर्भात फोन येतो. क्यूएस ऍप डाऊनलोड करायला सांगितलं जातं आणि त्यानंतर पेटीएममध्ये १० रुपये भरायला सांगितलं जातात. आणि सर्व प्रक्रिया केल्यांनतर नागरिकांचं आधारकार्ड, पॅनकार्ड स्कॅन केलं जातं आणि नागरिकांच्या बँक खात्यातून तसंच पेटीएममधून आरोपी परस्पर पैसे काढून नागरिकांची फसवणूक करत आहेत. ठाणे, डोंबिवली भागात अशा पध्दतीने गेल्या १० दिवसात ७ जणांची फसवणूक करण्यात आली. 

जवळपास ५ लाख ४ हजार ८०७ रुपायांची ही फसवणूक केली आहे. याप्रकरणी डोंबिवली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींचा शोध घेण्यासाठी स्थानिक पोलिसांनी सायबर सेलची मदत घेतली आहे.

नागरिकांची फसवणूक होऊ नये यासाठी ठाणे पोलिसांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून जनजागृती करण्यावर भर दिला आहे. ठाणे पोलिसांच्या ट्विटर खात्यावरून ही जनजागृती करण्यात येत असून याबाबत काही पोस्टही अपलोड करण्यात आल्या आहेत.

नागरिकांनी सजग राहण्यासाठी कोणत्याही फसव्या कॉलला प्रतिसाद देऊ नय़े. क्यूएस किंवा डेस्क अॅप डाऊनलोड करू नका. मॉल किंवा कुठेही गेल्यास आपला मोबाइल नंबर देणं टाळा. तसेच अनोळखी वेबसाईट तसेच ऍपवरही नंबरची नोंदणी करणं टाळलं पाहिजे.

Read More