Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

मुलीने क्लास सोडल्याचा राग, पालकांना धडा शिकवण्यासाठी कोचिंग क्लास मालकाने केलं भयानक कृत्य

शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी घटना, कोचिंग क्लास मालकाच्या कृत्याने पालघर हादरलं

मुलीने क्लास सोडल्याचा राग, पालकांना धडा शिकवण्यासाठी कोचिंग क्लास मालकाने केलं भयानक कृत्य

हर्षद पाटील, झी मीडिया, पालघर : शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी घटना पालघर जिल्ह्यातील वाडा इथं समोर आली आहे. मुलीला कोचिंग क्लासमधून काढल्याने चक्क कोचिंग क्लास चालवणाऱ्या शिक्षकाने त्या मुलीचं अपहरण केल्याची घटना घडली आहे. पालघर पोलिसांच्या सतर्कतेमुळे अवघ्या बारा तासात या मुलीचा शोध घेण्यात आणि आरोपीच्या मुसक्या आवळण्यात पालघर पोलीस प्रशासनाला यश आलं आहे .

नेमकी घटना काय?
समीर ठाकरे हा शिक्षक वाडा इथं चाणक्य कोचिंग क्लासेसच्या नावाने खाजगी क्लासेस चालवतो. या कोचिंग क्लासमध्ये सहावीत शिकणाऱ्या 13 वर्षांच्या मुलीने प्रवेश घेतला. या मुलीचे वडिलही पेशाने शिक्षक आहेत. काही कराणाने वडिलांनी त्या मुलीला कोचिंग क्लासला न पाठवण्याचा निर्णय घेतला. 

मात्र याचा राग मनात धरून कोचिंग क्लास चालवणाऱ्या समीर ठाकरे यांनी चक्क त्या मुलीचच अपहरण केलं. मुलगी आपल्या घरी परतत असताना तिच्या बिल्डिंगच्या आवारातून तिचं अपहरण करण्यात आलं. स्विफ्ट कारमधून या मुलीला वाडा तालुक्यातील एनशेत इथल्या एका फार्म हाऊसच्या खोलीत तिला डांबून ठेवण्यात आलं. 

मुलीच अपहरण झाल्याचं लक्षात येताच वडिलांनी फिर्याद दिल्यानंतर पालघर पोलिसांनी आपली तात्काळ तपास सुरु केला. अवघ्या बारा तासात पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या आणि मुलीची सुखरुप सुटका केली. याप्रकरणी एका आरोपीला ताब्यात घेण्यात आलं असून आणखी 2 आरोपी फरार आहेत. पालघर पोलिसांकडून त्यांचा शोध सुरु आहे. 

खाजगी कोचिंग क्लास मधून मुलीला काढल्याचा समीर ठाकरेच्या मनात असल्याचा मुलीच्या कुटुंबीयांकडून करण्यात आला आहे. तसंच मुलीची अवघ्या बारा तासात सुखरूप सुटका केल्याने मुलीच्या कुटुंबीयांकडून समाधान व्यक्त करत पोलीस प्रशासनाचे आभारही मानण्यात आले.

Read More