Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

राष्ट्रवादीचे आमदार नेमके कुणाचे? जितेंद्र आव्हाड यांच्या पत्रामुळे विषय पुन्हा चर्चेत

शपथ घेतलेल्या 9 मंत्र्यांव्यतिरिक्त राष्ट्रवादीच्या इतर आमदारांना विरोधी खुर्चीत बसू द्या अशी मागणी करण्यात आलेय. राष्ट्रवादीचे प्रतोद जितेंद्र आव्हाडांचं विधानसभा अध्यक्षांना पत्र दिले आहे. 

राष्ट्रवादीचे आमदार नेमके कुणाचे? जितेंद्र आव्हाड यांच्या पत्रामुळे विषय पुन्हा चर्चेत

Maharashtra Politics : अजित पवार यांचा एक मोठा गट शिंदे फडणवीस सरकारमध्ये सामील झाला आहे. यामुळे राष्ट्रवादी पक्षात उभी फूट पडली आहे.  राष्ट्रवादीच्या फुटीनंतर दोन्ही गटाकडून आमदारांच्या पाठिंब्याचे दावे केले जात आहेत. अशातच राष्ट्रवादीच्या आमदारांना विरोधी खुर्चीत बसू द्यावं अशी मागणी करणारं पत्र मुख्य प्रतोद जितेंद्र आव्हाड यांनी विधानसभा अध्यक्षांना दिले आहे. 

राष्ट्रवादीच्या ज्या 9 आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतलीय त्यांना वगळून इतर आमदारांना विरोधी बाकावर बसू द्यावं अशी विनंती जितेंद्र आव्हाड यांनी पत्राद्वारे केली आहे. अजित पवारांसोबत गेलेले आमदारही राष्ट्रवादीचेच आहेत असा दावा जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. 

शरद पवार गटाचा विरोधी पक्षनेतेपदावर दावा कायम 

ज्या पक्षाची संख्या मोठी त्या पक्षाचा विरोधी पक्षनेता, कागदावर सध्यातरी आमचं संख्याबळ मोठं आहे असं म्हणत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे कार्याध्यक्ष जयंत पाटील यांनी विरोधी पक्षनेतेपदावर दावा कायम ठेवला आहे. अर्थात मित्रपक्ष चर्चा करून त्याबाबतचा निर्णय घेतील असंही त्यांनी म्हंटल आहे. 

काँग्रेस विरोधी पक्षनेतेपदावर दावा करणार 

विधीमंडळाच्या उद्यापासून सुरु होणा-या पावसाळी अधिवेशनात काँग्रेस विरोधी पक्षनेतेपदावर दावा करणार आहे. त्यासाठी काँग्रेसकडून विरोधी पक्षनेतेपदासाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचं नाव आघाडीवर आहे.. काँग्रेसच्या दिल्लीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेतला गेल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.. आज संध्याकाळी विरोधी पक्षनेतेपदाची घोषणा होण्याची शक्यता आहे. चव्हाण यांच्यासोबतच नाना पटोले, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात यांचंही नाव चर्चेत आहे.

उद्यापासून 4 ऑगस्टपर्यंत पावसाळी अधिवेशन होणार आहे. या पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सत्ताधारी आणि विरोधकांचा चहापान कार्यक्रम आहे. मात्र, या चहापान कार्यक्रमावर विरोधकांनी बहिष्कार घातला आहे.हे सरकार शेतकरी विरोधी, कलंकित सरकार असल्याची टीका अंबादास दानवेंनी केली. राज्यात सध्याचं राजकारण संतापजनक आणि घाणेरडं सुरू आहे. लोक याला संतापले असून, सत्तेसाठी स्वार्थाचं राजकारण सुरू आहे.सध्याच्या राजकीय परिस्थितीवर राज ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली.

Read More