Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

Nashik: डॉक्टरांनी मृत घोषित केल्यानंतर तासाभराने रुग्णाचे पाय हलले अन्...; जिल्हा रुग्णालयातील धक्कादायक प्रकार

Nashik Civil Hospital: संबंधित रुग्ण आगीत होरपळल्याने त्याला उपचारांसाठी सोमवारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्याच्यावर उपचार सुरु असतानाच अचानक त्याला प्रशिक्षित डॉक्टरने मृत घोषित केलं.

Nashik: डॉक्टरांनी मृत घोषित केल्यानंतर तासाभराने रुग्णाचे पाय हलले अन्...; जिल्हा रुग्णालयातील धक्कादायक प्रकार

Patient Announced Dead While He Was Alive: नाशिकमधील जिल्हा रुग्णालयामध्ये (Nashik District Hospital) एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथील एका जिवंत रुग्णाला मृत घोषित करण्यात आलं आहे. एका प्रशिक्षणार्थी डॉक्टरच्या देखरेखीखाली या रुग्णावर उपचार सुरु होते. आगीत 93 टक्के भाजलेला हा रुग्ण जिवंत असतानाच त्याला मृत घोषित करण्यात आलं. 

सखोल चौकशीचे आदेश

समोर आलेल्या माहितीनुसार रुग्णाच्या ईसीजी रिपोर्टनुसार या रुग्णाला डॉक्टरने मृत घोषित केलं. मात्र तासाभरामध्ये रुग्ण जिवंत असल्याचं समोर आलं. या घडलेल्या प्रकारामुळे रुग्णाच्या नातेवाईकांनी संताप व्यक्त केला आहे. नातेवाईकांनी रुग्णालयामध्ये गोंधळ घातला. रुग्णालय प्रशासनाने प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेत चौकशीचे आदेश दिले आहेत. ही व्यक्ती 93 टक्के भाजली होती तरी ती जिवंत असतानाच तिला मृत घोषित करण्यात आल्याने उडालेल्या गोंधळामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाणार आहे. 

नेमकं घडलं काय?

सोमवारी या व्यक्तीने स्वत:ला जाळून घेतलं होतं. हा रुग्ण एकूण 93 टक्के भाजलेला आहे. मात्र त्याचा ईसीजी रिपोर्ट काढल्यानंतर हृदयाच्या क्रिया बंद पडल्याचं दर्शवण्यात आलं. ईसीजीवर दिसणारी हृदयाचे ठोके दर्शवणारी लाईन फ्लॅट दाखवण्यात आल्याने प्रशिक्षित डॉक्टरला रुग्णाचा मृत्यू झाल्याचं वाटलं. त्यानंतर या महिला डॉक्टरने रुग्णाला मृत घोषित केलं. मात्र रुग्णाला मृत घोषित करण्यात आल्यानंतर एका तासाने त्या रुग्णाचे पाय हलले. तेव्हा हा रुग्ण अजून जिवंत असल्याचं समजलं आणि पुन्हा त्याच्यावर उपचार सुरु करण्यात आले.

नातेवाईकांचा संताप

एका तासाभर या रुग्णाच्या नातेवाईकांनी रुग्णाचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांच्या सांगण्यानुसार गृहित धरलं होतं. मात्र नंतर डॉक्टरांनीच रुग्ण जिवंत असल्याचं सांगितलं. या प्रकारामुळे नातेवाईक पूर्णपणे गोंधळून गेले. नंतर घडलेला प्रकार समोर आल्यानंतर त्यांनी रुग्णालयात गोंधळ घातला. अशाप्रकारे बेजबाबदारपणे डॉक्टर जिवंत व्यक्तीला मृत कसं काय घोषित करु शकतात असा सवाल नातेवाईकांनी केला. या रुग्णाच्या नातेवाईकांनी संबंधित महिला डॉक्टरविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. रुग्ण जिवंत असल्याचं समजल्यानंतर नातेवाईकांना नेमकं काय सुरु आहे हे आधी कळलं नाही. मात्र घडलेला प्रकार समोर आल्यानंतर त्यांनी रितसर तक्रार दाखल केली असून या प्रकरणाची चौकशी केली जाईल असं आश्वासन रुग्णालय प्रशासनाने दिलं आहे. चौकशीचे आदेशही प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. या रुग्णाची ओळख रुग्णालयाकडून जाहीर करण्यात आलेली नाही.

Read More