Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

कल्याणमध्ये मेट्रो प्रकल्पांच्या उद्घाटनानंतर मोदी म्हणतात...

कल्याणमध्ये त्यांनी आपल्या भाषणाची सुरुवात मराठीतून केली

कल्याणमध्ये मेट्रो प्रकल्पांच्या उद्घाटनानंतर मोदी म्हणतात...

कल्याण : पंतप्रधान नरेंद्र मोदी मेट्रो-५ च्या उद्घाटनासाठी कल्याणच्या फडके मैदानात उपस्थित झाले. यावेळी, पंतप्रधानांनी मेट्रो-५ आणि मेट्रो-९ या दोन मेट्रो प्रकल्पाचं रिमोटनेच भूमीपूजन केलं. याचसोबत, पंतप्रधानांनी सिडको गृहप्रकल्पाचं भूमीपूजन करत पंतप्रधान आवास योजनेंतर्गत पाच जणांना घरांचा ताबा पत्रंही दिलं.

भाषणाची सुरुवात मराठीतून

कल्याणमध्ये त्यांनी आपल्या भाषणाची सुरुवात मराठीतून केली. जो येतो तो मुंबईच्या रंगात रंगून जातो, असं कल्याण-डोंबिवलीकरांना संबोधत त्यांनी जनतेला साद घातली. मुंबई ठाणे हे देशाचे असे भाग आहेत ज्यांनी विकासात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. जी लोकं इथे येतात ते इथे मिसळून जातात... इथल्या मराठी संस्कृतीमध्ये मिसळून जातात. मात्र इथे आता पायाभूत सुविधांवर ताण पडत आहे. त्यामुळेच गेल्या चार - साडे चार वर्षात वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत, असं मोदींनी यावेळी म्हटलं.

 

'पायाभूत सुविधांवर भर'

वेगाने विकसित होणाऱ्या जगातील पहिल्या १० शहरातील सर्वच्या सर्व शहरे ही भारतात असणार आहेत, अशी आशाही मोदींनी यावेळी जनतेसमोर व्यक्त केली. एनडीए सरकार पायाभूत सुविधांवर भर देत आहे... लोकल सेवा सुधारणा करण्यावर भर दिला जातोय, मेट्रो व्यवस्था या परिसरमध्ये उभी करत आहोत, असंही त्यांनी म्हटलं. 

यूपीए सरकारवर टीका करण्याची संधी त्यांनी सोडली नाही. २००६ ला मुंबईत पहिल्या मेट्रोचे भूमीपूजन झाले, मात्र नंतर कुठे गाडी अडली हे सांगणं कठीण आहे. पहिली लाईन सुरू झाली ते सुद्धा ११ किमी लांबीची... त्यामुळेच आम्ही गेल्या चार वर्षांत मेट्रो मार्ग उभारण्यावर भर दिला. २०२४ पर्यंत २७५ किमीचे मेट्रो मार्ग मुंबई आणि परिसरमध्ये बघायला मिळतील, असं आश्वासन मोदींनी नागरिकांना दिलंय. 

'रेरा' अंमलबजावणी फायद्याची 

'रेरा' कायद्याची महाराष्ट्रात सर्वप्रथम अंमलबजावणी करण्यासाठी यावेळी मोदींनी मुख्यममंत्री देंवेंद्र फडणवीस यांची पाठही थोपटली. सिडकोची घरे येत्या तीन वर्षात पूर्ण होतील. पहिल्या सरकारपेक्षा आमचे संस्कार वेगळे आहेत... गेल्या सरकारने फक्त ३५ लाख घरे बांधली मात्र, आमच्या सरकारने १ कोटी७५ लाख घरे बांधली... याचा अर्थ जर हे काम त्यांना करायचे असेल तर दोन पिढ्या गेल्या असत्या... ही काही आदर्श सोसायटी नाहीये आम्ही जी घरे बांधत आहोत ती आदर्श सोसायटी - घरे असतील की जिथे सर्वसामान्य यांची स्वप्ने पूर्ण होतील... गेल्या आठ-नऊ महिन्यांत तुलनेनं नवी घरं विकत घेण्याचा वेग जास्त झाला आहे... गेल्या वर्षाच्या तुलनेत हा वेग दुप्पट आहे, असंही त्यांनी म्हटलं. एलईडी दिवे वाटपात महाराष्ट्र पुढे आहे, विजेची बचत मोठ्या प्रमाणात होत आहे, त्यामुळे ११०० कोटी विजेचे बिल राज्यात कमी झाले आहे, असंही पंतप्रधान मोदींनी सांगितलंय.

जीएसटीबद्दल मोदी म्हणतात...

दरम्यान, याआधी नरेंद्र मोदी मुंबईत एका कार्यक्रमात उपस्थित झाले होते. यावेळी, ९९ टक्के वस्तूंवर १८ टक्क्यांपेक्षा कमी जीएसटी लागणार असल्याचे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलंय. जीएसटी लागू करण्याआधी नोंदणीकृत कंपन्यांची संख्या ६५ लाख होती, ज्यामध्ये ५५ लाखांची भर पडलीय असंही मोदी म्हणालेत. चैनीच्या काही वस्तूंवर २८ टक्के जीएसटी असेल, बाकी वस्तूंवर २८ टक्के कर राहणार नाही असं मोदी म्हणालेत. सर्वसामान्य जनता वापरते अशा या ९९ टक्के वस्तू कमी करांमध्ये आल्या तर त्याचा सर्व जनतेला लाभ होईल अशी आशा त्यांनी व्यक्त केलीय. तसंच कंपन्यांसाठी जीएसटी जितका सुलभ करता येईल तितका करण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय. 

Read More