Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

नागपूर हनीट्रॅप प्रकरणातील साहिल सय्यदचं घर पाडण्याची कारवाई सुरु

साहिल सय्यदचा बगदादिया कॉलोनीतील आलिशान बंगला पाडण्याचं काम सुरु...

नागपूर हनीट्रॅप प्रकरणातील साहिल सय्यदचं घर पाडण्याची कारवाई सुरु

नागपूर : नागपूरचा गुंड आणि कथित हनी ट्रॅप प्रकरणाचा मुख्य आरोपी साहिल सय्यदचं घर पाडण्याची कारवाई सुरु करण्यात आली आहे. नागपूर महापालिका आणि पोलिसांनी संयुक्तरित्या साहिल सय्यदचा बगदादिया कॉलोनीतील आलिशान बंगला पाडण्याचं काम सुरु केलं आहे. साहिल सय्यदने बगदादिया कॉलोनीमध्ये एका धार्मिक स्थळाची 16 एकर जागा बळकावली होती. आणि तिथे स्वतःचा बंगला बांधत उर्वरित जागा प्लॉट पाडून नियमबाह्य पद्धतीने विकली होती.

काही दिवसांपूर्वी नागपूरच्या भाजप नेत्यांना हनी ट्रॅपमध्ये अडकवा अशी ऑडिओ क्लिप वायरल झाली होती. त्यातील एक आवाज साहिल सय्यदचा असल्याचं पोलीस तपासात समोर आलं होतं. पोलिसांनी साहिल सय्यदवर गुन्हा नोंदवल्यानंतर एकामागे एक गुन्हे दाखल होण्याची प्रक्रिया सुरु झाली होती. जमीन बाळकावणं, घरावर कब्जा करणं, खंडणी मागणं, फसवणूक करणं असे गुन्हे दाखल झाल्यानंतर साहिल सय्यदला अटक झाली होती.

सामान्यांची जमीन बळकावणाऱ्या गुंडाला धडा शिकवण्यासाठी नागपूर महापालिका आणि पोलिसांनी कंबर कसली आणि आज त्याचा आलिशान बंगला पाडायला सुरुवात केली आहे. याआधी कुख्यात गुंड संतोष आंबेकरचा बंगला पाडून नागपूरकारांच्या मनातील गुंडांची भीती कमी करण्यात महत्वाची भूमिका बजावणारे डीसीपी गजानन राजमाने यांनी या प्रकरणात ही महत्त्वाची भूमिका बजावली आणि आणखी एका गुंडांचा बंगला भुईसपाट करुन दाखवला आहे.

 

Read More