Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

काटोल विधानसभेच्या पोटनिवडणुकीला नागपूर खंडपीठाची स्थगिती

काटोल मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीवर प्रश्नचिन्ह

काटोल विधानसभेच्या पोटनिवडणुकीला नागपूर खंडपीठाची स्थगिती

नागपूर : काटोल विधानसभेच्या पोटनिवडणुकीला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं स्थगिती दिली आहे. निवडून आलेल्या आमदाराला केवळ ३ महिन्यांचा कालावधी मिळणार आहे. तसंच ३ महिन्यांनी पुन्हा निवडणूक होणार असल्यामुळे खर्चही दुप्पट होणार आहे. त्यामुळे निवडणूक रद्द करण्याची मागणी करत भाजपचे पंचायत समिती सभापती संदीप सरोदे यांनी न्यायालयात धाव घेतली होती. यावर झालेल्या सुनावणीत निवडणुकीला स्थगिती देत निवडणूक आयोगाला उत्तर देण्यासाठी २ आठवड्यांची मुदत दिली आहे. भाजप आमदार आशिष देशमुख यांच्या राजीनाम्यामुळे ही जागा रिक्त आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही ही निवडणूक कोणी लढवू नये आणि एका सामाजिक कार्यकर्त्याला सर्वसहमतीनं बिनविरोध निवडून द्यावं, असं आवाहन सर्व पक्षांना केलं होतं.

विधानसभेची निवडणूक ही ऑक्टोबरमध्ये होणार असल्याने ही पोटनिवडणूक आता घेऊन मनुष्यबळ, वेळ, ऊर्जा आणि सरकारी निधी व्यर्थ घालवू नये असे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे. ११ एप्रिल २०१९ रोजी येथे मतदान होतं तर २३ मे २०१९ रोजी निकाल जाहीर होणार होता. विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन जून-२०१९ मध्ये आहे. यादरम्यान निवडून येणाऱ्या सदस्याला शपथ देण्याची प्रक्रिया केली जाईल. पण लगेचच विधानसभेची निवडणूक होणार असल्याने नव्या आमदाराला फक्त ३ महिने मिळतील.

१५ ऑक्टोबर २०१४ रोजी झालेल्या विधानसभा निवडणुकीत काटोलमधून आशिष देशमुख विजयी झाले होते. पण नंतर त्यांनी भाजपचा राजीनामा दिला. ते सध्या काँग्रेसमध्ये आहेत.

Read More