Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

Monsoon 2024: यंदाच्या वर्षी दमदार पाऊस? फेब्रुवारीतच विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात बरसणार

Monsoon 2024 Rain Prediction: कमी पाऊस पडल्याने अनेक भागांमध्ये दुष्काळी परिस्थिती दिसत आहे. महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये अवकाळी पाऊस आणि दुष्काळजन्य परिस्थितीमुळे शेतकऱ्यांचे हाल झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.

Monsoon 2024: यंदाच्या वर्षी दमदार पाऊस? फेब्रुवारीतच विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात बरसणार

Monsoon 2024 Rain Prediction: सरलेल्या वर्षात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडल्याने सध्या अनेक भागांमध्ये दुष्काळी परिस्थिती असतानाच एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. यंदाच्या वर्षी म्हणजेच 2024 पॅसिफिक महासागरामध्ये एल-निनोची स्थिती फेब्रुवारी महिन्यामध्येही जैसे थे राहणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र एल-निनोची स्थिती हळूहळू निष्क्रीय होईल असा भारतीय हवामान खात्याचा अंदाज आहे. यामुळेच यंदाच्या वर्षी समाधानकारक पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्या तरी पॅसिफिक महासागरामध्ये एल-निनोची स्थिती कायम आहे. त्या ठिकाणी समुद्रातील पाण्याचे तापमान हे सरासरीपेक्षा अधिक आहे. फेब्रुवारी संपेपर्यंत ही स्थिती कायम राहण्याचा अंदाज असून नंतर मात्र स्थिती सामान्य होईल. असं झाल्यास यंदा पावसाळ्यामध्ये चांगला पाऊस पडण्याची शक्यता अधिक आहे, असं भारतीय हवामान विभागाचे महासंचालक डॉ. मृत्युंजय महापात्रा यांनी सांगितलं आहे.

विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात धो धो

फेब्रुवारीमध्ये देशभरात सरासरीपेक्षा जास्त पाऊस होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. दरवर्षी भारतात फेब्रुवारी महिन्यात सरासरी 22.7 मिलीमीटर पाऊस पडतो. मात्र यंदा या सरासरीच्या तुलनेत 119% अधिक पावसाचा अंदाज आहे. विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात या महिन्यात पाऊस पडण्याची शक्यता अधिक आहे. मागील वर्षभरात देशातील किमान तापमान सरासरीपेक्षा अधिक राहिल्याचं आकडेवारीवरुन स्पष्ट होत आहे. जानेवारी महिन्यातही किमान तापमान हे सरासरी तापमानापेक्षा 1 ते 3 अंश सेल्सिअस जास्तच होते. हाच ट्रेण्ड फेब्रुवारी महिन्यातही पाहायला मिळणार आहे. फेब्रुवारीतही किमान तापमान सरासरीपेक्षा जास्त राहील असा हवामान खात्याचा अंदाज आहे. असं असलं तरी महाराष्ट्रात मात्र मुंबई तसेच किनारपट्टीचा भाग वगळता कमाल तापमान सरासरी इतकेच राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून उत्तर भारतात थंडीची लाट येण्याची पुसटशी शक्यता आहे

जानेवारीत सरासरीपेक्षा कमी पाऊस

देशभरातील आकडेवारीचा विचार केल्यास जानेवारी महिन्यात सरासरी 7.2 मिमी पाऊस पडला. जानेवारी महिन्यात देशामध्ये सरासरी 17.1 मिमी पाऊस पडतो. उत्तर भारतात सरासरी 33.8 मिमी पाऊस पडतो, मात्र यंदाच्या वर्षी फक्त 3.1 मिमी पाऊस पडला आहे. ईशान्य भारतात सरासरी 17.2 मिमी पाऊस पडतो, प्रत्यक्षात मात्र 5.6 मिमी पाऊस पडला. मध्य भारतातील सरासरी 7.4 मिमी इतकी असली तरी यंदा 5.3 मिमी पाऊस झाला. केवळ दक्षिण भारतात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. दक्षिण भारतामध्ये जानेवारीमध्ये सरासरी 7.8 मिमी पाऊस पडतो मात्र यंदा 133% अधिक म्हणजेच 18.2 मिमी पाऊस पडला.

हिंदी महासागरामध्ये बाय पोलार स्थिती

दुसरीकडे हिंदी महासागरामध्ये बाय पोलार स्थिती निर्माण झाली असून पुढल्या एक ते दोन महिन्यामध्ये ही स्थिती तटस्थ अवस्थेत पोहचेल असा अंदाज आहे.

Read More