Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

'तुम्ही सर्वांनी...', वसंत मोरेंनी राजीनामा दिल्यानंतर राज ठाकरेंचे पुण्यातील पदाधिकाऱ्यांना आदेश

पुण्यातील मनसेचे फायरब्रँड नेते अशी ओळख असणारे वसंत मोरे यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. यामुळे मनसेला मोठा धक्का बसला असून, पुण्यात मोठी हालचाल सुरु आहे.   

'तुम्ही सर्वांनी...', वसंत मोरेंनी राजीनामा दिल्यानंतर राज ठाकरेंचे पुण्यातील पदाधिकाऱ्यांना आदेश

पुण्यातील मनसेचे फायरब्रँड नेते अशी ओळख असणारे वसंत मोरे यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. साहेब मला माफ करा अशी फेसबुक पोस्ट शेअर करत वसंत मोरे यांनी आपण मनसे पक्षातून राजीनामा देत असल्याचं जाहीर केलं. पक्षांतर्गंत राजकारणाला कंटाळून आपण पक्षातून बाहेर पडत असल्याचा खुलासा त्यांनी केला आहे. पत्रकार परिषदेत आपल्या भावना मांडताना त्यांना अश्रू अनावर झाले होते. दरम्यान वसंत मोरे यांच्या राजीनाम्यानंतर राज ठाकरे यांनी पुण्यातील पदाधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत.

"वारंवार एकनिष्ठतेवर संशय घेतला जात असेल, सांगूनही माझ्यावरच कारवाया होत असतील तर मी हतबल आहे. मी लोकसभा निवडणूक लढण्यास इच्छुक असल्याचं बोललो होतो. पण पुण्यात लोकसभा लढण्यासाठी नकारात्मक वातावरण असून आपण लढू शकत नाही असे रिपोर्ट पाठवले जात आहेत. संघटनेला पूरक वातावरण असतानाही डावललं जात असेल आणि जर राज ठाकरेंपर्यंत चुकीचे संदेश जात असतील तर येथे थांबण्यात काही अर्थ नाही. अखेर अपमान किती सहन करायचा. म्हणून आज एकनिष्ठतेचा कडेलोट केला," असा आरोप वसंत मोरेंनी केला आहे. 

'....अपमान किती सहन करायचा', 'मनसे'चा राजीनामा दिल्यानंतर वसंत मोरेंची पहिली प्रतिक्रिया

 

वसंत मोरे यांच्या राजीनाम्यामुळे पुण्यात खळबळ उडाली आहे. पुण्यात मनसेला भक्कम करण्यात वसंत मोरे यांनी मोठी भूमिका निभावली आहे. त्यामुळे त्यांचा राजीनामा मनसेसाठी मोठा धक्का मानला जात आहे. वसंत मोरे यांनी राजीनामा दिल्यानंतर कार्यालयाबाहेरही समर्थकांनी गर्दी केली होती. यादरम्यान सूत्रांच्या माहितीनुसार, राज ठाकरे यांनी पुण्यातील मनसेच्या पदाधिकाऱ्यांना 'वसंत मोरे राजीनामा प्रकरणी माध्यमांवर प्रतिक्रिया देवू नका असा आदेश दिला आहे. 

वसंत मोरेंना अश्रू अनावर

"गेल्या दीड वर्षापासून मी लोकसभेची निवडणूक लढवण्यासाठी इच्छूक आहे. त्यानंतर गेल्या काही महिन्यापासून इच्छुकांची संख्या वाढत गेली. राज ठाकरे यांच्यापर्यंत नकारात्मक अहवाल सादर केला गेला. काही पक्षातील लोकांनी जाणूनबुजून नकारात्मक अहवाल पाठवले. राज ठाकरे यांच्याकडे चुकीची माहिती गेली. माझ्यावर वेळोवेळी अन्याय होत आहे. मी माझ्या आयुष्यातील ज्या लोकांसोबत, ज्या पदाधिकाऱ्यांसोबत 15 वर्ष घालवली त्याच लोकांनी वसंत मोरेला तिकीट नाही मिळालं पाहिजे असं म्हटलं. मनसेने पुण्यात निवडणूक लढवली नाही पाहिजे, असं राज ठाकरे यांना सांगण्यात आलं. मी आता परतीचे दोर कापले आहेत," असं सांगताना वसंत मोरे यांना अश्रू अनावर झाले होते. 

"माझ्या साथीदारांवर चुकीच्या कारवाया होत असतील, तर मी का रहावं? राज ठाकरे यांच्याकडे मी वेळ मागितला. माझा वाद राज ठाकरे यांच्यासोबत नव्हता. पण चुकीच्या लोकांकडे शहर दिलं गेलंय. परंतू राज ठाकरे मला यासंदर्भात बोलले नाहीत. मी रात्रभर झोपलो नाही. निवडणूक लढवणं हा माझा गुन्हा आहे का?," असा सवाल वसंत मोरे यांनी विचारला. 

"मी अनेकदा राज ठाकरेंपर्यंत या गोष्टी पोहोचवल्या आहेत. पण आज माझा कडेलोट झाला आहे. यासाठी मीच कारणीभूत आहे. पुणेकर माझी पुढील दिशा ठरवतील. माझ्या वयाची 25 वर्षं ज्या पक्षात घालवली तो सोडल्यानंतर पुणेकर पुढील वाटचाल ठरवतील," असंही वसंत मोरे म्हणाले आहेत.

Read More