Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

मनसेचा दणका : अमेझॉनची दिलगिरी, मराठीचा वापर करण्याचं आश्वासन

 येणाऱ्या दिवसात तुम्हाला अमेझॉन मराठीतून दिसेल

मनसेचा दणका : अमेझॉनची दिलगिरी, मराठीचा वापर करण्याचं आश्वासन

मुंबई : महाराष्ट्रात मराठी भाषेसाठी आग्रही असणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या दणक्यानंतर अमेझॉन आता मराठी भाषा बोलू लागणार आहे. अमेझॉनच्या अ‍ॅपमध्ये मराठी भाषेचा समावेश करावा अशी मागणी केली होती. मनसेच्या या भूमिकेची अमेझॉनचे संस्थापक जेफ बेजॉस यांनी दखल घेतलीय. अमेझॉन.इन या अ‍ॅपमध्ये मराठी भाषेला प्राधान्य द्या अशी मागणी मनसेच्या वतीने करण्यात आली होती. काही दिवसातच ही मागणी मान्य करण्यात आली असून येणाऱ्या दिवसात तुम्हाला अमेझॉन मराठीतून दिसणार आहे.  

अमेझॉनला मराठी भाषेच्या वापरासंदर्भात मनसेचे अखिल चित्रे यांनी ई-मेल पाठवला होता. बेजॉस यांच्या वतीनं ‘अमेझॉन.इन’च्या जनसंपर्क विभागाने त्यास प्रतिसाद दिलाय. ‘बेजॉस यांना आपला मेल मिळाला आहे. अॅमेझॉन अ‍ॅपमधील त्रुटींमुळं आपल्याला जो मनस्ताप झाला, त्याबद्दल आम्ही दिलगीर आहोत असे या पत्रात म्हटलंय. 

संबंधित विभागाला तुमच्या तक्रारीबद्दल कळवण्यात आलं असून लवकरच त्यावर कार्यवाही केली जाईल, असं अमेझॉनने स्पष्ट केलंय. अखिल चित्रे यांनी अमेझॉनच्या या ई-मेलची प्रत ट्विटरवर शेअर केलीय. त्यामुळे येत्या दिवसात अमेझॉनची शॉपिंग मराठीतून करता येणार आहे. 

मनसेच्या मागणीची बेजॉस यांनी दखल घेतलीय. अमेझॉनचे शिष्टमंडळ आज मुंबईत येत असल्याचंही चित्रे यांनी म्हटलं आहे. तुम्ही तुमच्या भाषेवर ठाम असाल तर जग तुमची दखल घेतं असं राज ठाकरे म्हणतात असंही चित्रे यांनी ट्वीट करत म्हटलंय.

Read More