Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

कोकणातलं मीनी महाबळेश्वर! महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने थंड हवेचे ठिकाण म्हणून घोषीत केलेले रत्नागिरीतलं माचाळ गाव

रत्नागिरीतलं माचाळ गाव हे कोकणातलं मीनी महाबळेश्वर म्हणून ओळखले जाते. इथलं अप्रतिम निसर्गसौंदर्य पर्यटकांना मोहित करुन टाकते.  

कोकणातलं मीनी महाबळेश्वर! महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने थंड हवेचे ठिकाण म्हणून घोषीत केलेले रत्नागिरीतलं माचाळ गाव

Machal Village Ratnagiri : कोकणात समुद्र किनारे आणि इथला निसर्ग कायमच पर्यटकांना खुणावत असतो. मात्र याच कोकणात असं एक ठिकाण आहे  ते पर्यटकांना आता खुणावतंय. या ठिकाणाला कोकणातलं मीनी महाबळेश्वर असंही संबोधलं जातं. हे आहे रत्नागिरीतलं माचाळ गाव.  

हिरवीगार झाडी... नागमोडी वळणाचा रस्ता... परिसरात पूर्णपणे धुके... थंड वातावरण... डोंगरावरून कोसळणारे धबधबे... अशा सर्व गोष्टीनी वेढलेले हे गाव सध्या रत्नागिरीतलं मीनी महाबळेश्वर म्हणून ओळखले जाते. या गावाला महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने थंड हवेचे ठिकाण अर्थात पर्यटनस्थळ म्हणून घोषित केले आहे. 

लांजा तालुक्यातील छोटसं माचाळ गाव समुद्र सपाटीपासून सुमारे चार हजार फुटांवर वसलेलं आहे. खाली उतरलेले आभाळ. आल्हाददायक स्वच्छ हवा. या वातावरणातला प्रवास आपल्याला ताजातवाना करतो आणि पावसाळ्यात हे गाव पर्यटकांना खासकरून खुणावतो.

माचाळ गावातून मुचकुंदी नदीचा उगम होतो खरं तर या गावात मुचकुंदी  ऋषिंची गुहा आहे याच ठिकाणाहून या नदीचा उगम झाल्याचं सांगितलं जातं त्यामुळेच या नदीला मुचकुंदी नदी असं संबोधलं जातं. अवघे तीनशे ते चारशे लोकवस्तीचं हे माचाळ गाव आहे. येथील घरे कौलारु डोंगर उताराची आणि मातीची आहेत. पावसाळ्यात येथे कायम धुके असते त्यामुळे घरांच्या चहूबाजूला झाडांच्या पानांनी पूर्णपणे शाकारणी करावी लागते.  माचाळची दुसरी खासियत म्हणजे इथून विशाळगडावर एक ते दीड तासांत पोचता येतं. माचाळचे ग्रामस्थही विशाळगडावर पाणी, दूध पुरवणे किंवा इतर कामांसाठी सतत येऊन जाऊन असतात.

एका डोंगरावर वसलेले माचाळ घनदाट जंगलानी समृद्ध तर आहेच पण इथल्या जंगलाचं वैशिष्टय़ हे की या जंगलांमध्ये औषधी वनस्पती मोठय़ा प्रमाणात आढळतात आणि म्हणूनच या ठिकाणी आल्यावर इथला निसर्ग पाहिल्यानंतर पर्यटकांना या ठिकाणाबद्दल शब्दात वर्णन करणं कठीण जातं.

माचाळ हे गाव पदभ्रमणासाठी रत्नागिरी जिल्हा हा एक उत्तम पर्याय. सुंदर निसर्ग, खळाळणारे पाणी, दाट धुके, नागमोडी वाटा, अतिशय नयनरम्य परिसर माचाळचा पाहण्याजोगा आहे. तुम्हीही एकदा येथे पावसाळ्यात भेट देऊन कोकणातल्या निसर्गसोंदर्याचा आगळा वेगळा आंनद नक्कीच घेऊन पहा. 

Read More