Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

'देवेंद्र फडणवीस भाजपमध्ये आहेत तोपर्यंत मतदान करणार नाही'; सोलापुरात मराठा समाजाने घेतली शपथ

Maratha Reservation : भाजप आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात मराठा समाज पुन्हा एकदा आक्रमक झाला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या पक्षाला मतदान करणार नाही अशी शपथ सोलापुरातल्या मराठा समाजाने घेतली आहे.

'देवेंद्र फडणवीस भाजपमध्ये आहेत तोपर्यंत मतदान करणार नाही'; सोलापुरात मराठा समाजाने घेतली शपथ

अभिषेक आदेप्पा, झी मीडिया, सोलापूर : सोलापुरात मराठा समाज पुन्हा एकदा आक्रमक झाला आहे. सोलापुरातल्या एका गावात मराठा समाजाने भाजपा आणि मित्र पक्षाला मतदान न करण्याची सामूहिक शपथ घेतली आहे. ग्रामस्थांनी छत्रपती शिवाजी महाराजांना साक्ष ठेवत ही शपथ घेतली. सरकारने दिलेले आरक्षण हे कोर्टात टिकणारे नसून , मराठा समाजाची फसवणूक झाल्याचा आरोप मराठा समाजाने केला. त्यामुळे यापुढे भाजपच्या उमेदवाराला मतदान करणार नाही, अशी शपथ गावातल्या मराठा समाजाने घेतली आहे.

उत्तर सोलापूर तालुक्यातील कोंडी ग्रामस्थ भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात आक्रमक झाले आहेत. मराठा समाजाच्या वतीने भाजप आणि देवेंद्र फडणीवीसांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात येत आहे. यावेळी सामूहिक शपथ घेण्यात आली आहे. जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षीने शपथ घेतली आहे. भाजप, देवेंद्र फडणवीस किंवा त्यांच्या मित्रपक्षाला आम्ही सहकार्य करणार नाही अशी शपथ घेतली आहे. त्यामुळे भाजपच्या कोणत्याही उमेदवाराने कोंडी गावामध्ये पाऊल ठेवताना दहावेळा विचार केला पाहिजे, असा इशारा कोंडी ग्रामस्थांनी दिला आहे.

"10 टक्के आरक्षणाची मागणी मराठा समाजाची नव्हती. आम्हाला 50 टक्के ओबीसी प्रवर्गातून आरक्षण हवं आहे. पण शासनाने दिलेलं आरक्षण न्यायालयात टिकणार नाही हे आम्हाला आणि सरकारलाही माहिती आहे. त्यामुळे याचे आम्हाला काही आश्चर्य नाही. त्यामुळे या निर्णयाचा आम्हाला कुठलाही आनंद झाला नाही. निवडणुकीच्या पूर्वी आमच्या तोंडासमोर हे गाजर धरलं. या भुलथापांना, खोट्या आश्वासनांना मराठा समाज बळी पडणार नाही. आमची एकच मागणी आहे की ओबीसी प्रवर्गातून आम्हाला आरक्षण हवं आहे," असे मराठा समाजाने म्हटलं आहे.

काय घेतली शपथ?

" जो पर्यंत मराठा समाजाला आतून विरोध करणारे, मराठा समाजाचा द्वेष करणारे देवेंद्र फडणवीस यांच्यासारखे नेते जोपर्यंत भाजपमध्ये आहेत तो पर्यंत या पक्षाच्या उमेदवाराला अथवा यांच्या पक्षाशी युती करणाऱ्या पक्षाच्या उमेदवाराला आम्ही मतदान करणार नाही," अशी शपथ मराठा समाजाच्या लोकांनी घेतली.

देवेंद्र फडणवीसांचे कोणते कार्यकर्ते हल्ला करतात मला बघायचे आहेत - मनोज जरांगे

आरक्षण हा मराठ्यांचा ज्वलंत प्रश्न आहे त्यामुळे मराठ्यांच्या नाराजीची लाट अंगावर नको म्हणून लोकसभा निवडणूक सरकार घेणारच नाही असं वक्तव्य मनोज जरांगे पाटील यांनी केलंय. मनोज जरांगे हे आज धाराशिव बिड सोलापूर आणि नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यासाठी रवाना झालेत यावेळी पत्रकारांशी ते बोलत होते. मराठ्यांच्या पोरांना पोलिसांनी उचललं अवघ्या तालुक्यातील मराठयांनी पोलीस ठाण्यात जाब विचारण्यासाठी जाऊन बसा असं आवाहन देखील त्यांनी मराठा समाजाला केलंय. फडणवीस यांचे कोणते कार्यकर्ते माझ्यावर हल्ला करतात तेही मला बघायचे आहेत असा इशारा देखील जरांगे यांनी फडणवीसांना दिला.

Read More