Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

राज्यातील 1000 जणांना टुरिस्ट गाईड होण्याची संधी

पर्यटनाची (Tourism) आवड असणाऱ्या होतकरु उमेदवारांना पर्यटक मार्गदर्शक प्रशिक्षण देऊन राज्यात एक हजार टुरिस्ट गाईड (Tourist Guide) तयार करण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन संचालनालयाने पुढाकार घेतला आहे.  

राज्यातील 1000 जणांना टुरिस्ट गाईड होण्याची संधी

मुंबई : पर्यटनाची (Tourism) आवड असणाऱ्या होतकरु उमेदवारांना पर्यटक मार्गदर्शक प्रशिक्षण देऊन राज्यात एक हजार टुरिस्ट गाईड (Tourist Guide) तयार करण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन संचालनालयाने पुढाकार घेतला आहे. या योजनेंतर्गत राज्याच्या विविध भागातील उमेदवारांना केंद्र सरकारच्या पर्यटन मंत्रालयाने तयार केलेल्या ऑनलाईन आयआयटीएफ टुरिजम फॅसिलिटेटर सर्टिफिकेशन प्रोग्रामअंतर्गत (Online IITF Tourism Facilitator Certification Program) मोफत पर्यटक मार्गदर्शक प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या प्रशिक्षणानंतर उमेदवारांना महाराष्ट्र शासन प्रमाणित टुरिस्ट गाईड (tourist guide) म्हणून प्रमाणपत्र देण्यात येणार असून त्यांना राज्यस्तरावर तसेच विविध पर्यटन ठिकाणी टुरिस्ट गाईड (tourist guide) म्हणून काम करण्याची संधी मिळणार आहे, अशी माहिती पर्यटन संचालक डॉ. धनंजय सावळकर यांनी दिली. (Maharashtra Tourism : Tourist Guide Training and Tourist Guide Course)

महाराष्ट्राचे वैविध्यपूर्ण निसर्गसौंदर्य, अद्वितीय ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा यामुळे राज्यात पर्यटकांचा ओघ वाढत आहे. इथे येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाला एक समृध्द व आल्हाददायक अनुभव देण्याचा महाराष्ट्र पर्यटन विभागाचा प्रयत्न आहे. भटकंती, प्रवास हा फक्त एक छंद म्हणून न जोपासता त्याला एक शैक्षणिक आणि व्यावसायिक जोड देण्याचा विचार करणाऱ्या राज्यातील इच्छुक उमेदवारांसाठी ही नक्कीच एक सुवर्णसंधी आहे, असे डॉ. सावळकर यांनी सांगितले.

या  डिजिटल उपक्रमामुळे  विद्यार्थी तथा उमेदवारांना त्यांच्या वेळेनुसार आणि ते ज्या ठिकाणी असतील तेथून, आपल्या सवडीनुसार हे ऑनलाइन शिक्षण घेण्याची संधी प्राप्त होणार आहे. http://iitf.gov.in या पोर्टलवर हिंदी आणि इंग्रजी भाषेत विविध पर्यटन विषयाच्या महत्त्वाच्या काही अभ्यासक्रमांसोबत सात मॉड्युल्ससह मूलभूत ऑनलाइन कोर्स उपलब्ध आहे. एकूण कार्यक्रम नोंदणी शुल्क दोन हजार रुपये असून परीक्षा शुल्क 500 रुपये आहे. हा अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या 1 हजार उमेदवारांना पर्यटन संचालनालयामार्फत नोंदणी शुल्क परत करण्यात येणार आहे. यामध्ये सहभागासाठी 18 ते 40 वयोगटातील उमेदवारांनी किमान बारावी उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे. 40 वर्षापेक्षा जास्त वयाच्या उमेदवाराचे किमान दहावी श्रेणी उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे.

उमेदवारास ऑनलाईन प्रशिक्षण आणि परीक्षेनंतर इंटर्नशिपची संधी आणि वर्तन कौशल्य प्रशिक्षणही देण्यात येईल. आयआयटीएफचे मूलभूत प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर राज्याच्या पर्यटन संचालनालयामार्फत एक दिवसाचे मूल्यांकन प्रशिक्षण घेतले जाईल आणि त्यानंतर "महाराष्ट्र पर्यटन परवानाकृत मार्गदर्शक" अशा स्वरूपात या उमेदवारास अंतिम प्रमाणपत्र देण्यात येईल. यशस्वी उमेदवारांना महाराष्ट्रातील सर्व पर्यटनस्थळे (केंद्रीय पुरातत्व विभागाच्या अधिपत्याखालील पर्यटनस्थळे वगळता) कोणत्याही पर्यटनस्थळांना सेवा देण्याची परवानगी दिली जाईल. अधिक माहितीसाठी http://iitf.gov.in पोर्टलवर किंवा  पर्यटन संचालनालय, महाराष्ट्र शासन, मुख्य कार्यालय, मुंबई यांच्याशी दूरध्वनी क्रमांक 022-62948817 वर किंवा  diot@maharashtratourism.gov.in या ईमेलवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Read More