Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

Maharashtra Kesari 2023 : महाराष्ट्र केसरी शिवराजने घेतली उदयनराजेंची भेट, राजे म्हणतात 'खेळात राजकारण नको'

Maharashtra Kesari 2023 : महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे आणि उपकेसरी महेंद्र गायकवाड यांनी घेतली उदयनराजे भोसले यांची भेट, चांगल्या खेळाडूंकडे राज्य सरकारने लक्ष देण्याची गरज असल्याचं उदयनराजेंची प्रतिक्रिया  

Maharashtra Kesari 2023 : महाराष्ट्र केसरी शिवराजने घेतली उदयनराजेंची भेट, राजे म्हणतात 'खेळात राजकारण नको'
Updated: Jan 17, 2023, 05:21 PM IST

Maharashtra Kesari 2023 : यंदाच्या महाराष्ट्र केसरीचा मान शिवराज राक्षेने (Shivraj Rakshe) पटकावला. महाराष्ट्र केसरीच्या अंतिम लढतीत शिवराजने महेंद्र गायकवाडला (Mahendra Gaikwad) अवघ्या काही मिनिटात चितपट करत महाराष्ट्र केसरीची मानाची गदा उंचावली. महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे आणि उप केसरी महेंद्र गायकवाड यांनी आज खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosle) यांची भेट घेतली. यावेळी उदयनराजे भोसले यांनी शिवराजचा पगडी आणि गदा देऊन सत्कार केला. 

'खेळात राजकारण नको'
महाराष्ट्र केसरी स्पर्धेचं (Maharashtra Kesari Spardha) नियोजन अतिशय उत्कृष्ट होतं, कुस्ती या खेळाला ऐतिहासीक पार्श्वभूमी आहे. कठोर मेहनतीच्या जोरावर शिवराजने महाराष्ट्र केसरीचा किताब पटकावला, त्याला मनापासून शुभेच्छा अशी प्रतिक्रिया उदयनराजे भोसले यांनी यावेळी व्यक्त केली. 

मोठ्या स्पर्धांच्या ठिकाणी राजकारण पाहिला मिळतं, हे थांबायला पाहिजे, चांगला खेळाडू असेल तर त्याला शिफारशीची गरज नाही, योग्य खेळाडूला संधी मिळायला हवी असं मत उदयनराजे यांनी म्हटलं आहे. ऑलिम्पिकला (Olympic) भारताची मोठी टीम जाते, पण पदक एखाददुसरंच मिळतं. दुसरीकडे छोटे छोटे देशांचे, ज्यांची नावंही माहित असतात अशा देशांचे खेळाडू अनेक मेडल घेऊन जातात, अशी खंतही उदयनराजे यांनी व्यक्त केली. चांगल्या खेळाडूंना राज्य सरकारने जास्तीत जास्त प्रोत्साहन दिलं पाहिजे. तर राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू तयार होतील असं मतही उदयनराजे यांनी व्यक्त केलं.

काका पवारांच्या तालमीत धडे
महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे हा पुणे जिल्ह्यातील राजगुरूनगर इथल्या राक्षेवाडीचा आहे. शिवराजने वस्ताद काकासाहेब पवार यांच्या आखाड्यात तालमीत कुस्तीचे धडे गिरवले.  विजेतेपदानंतर शिवराज राक्षेला महिंद्रा थार जीप आणि रोख रक्कम पाच लाखांचे बक्षीस देऊन गौरव करण्यात आला तर उपविजेता ठरलेल्या महेंद्र गायकवाडला ट्रॅक्टर व रोख अडीच लाखाचे बक्षीसाने सन्मान करण्यात आला. 

2 मिनिटातच केलं चीतपट
महाराष्ट्र केसरीच्या अंतिम लढतीत काही मिनिटातच शिवराज राक्षेने महेंद्र गायकवाडला मैदानात चीतपट करत विजय मिळवला आहे. अंतिम लढत अटीतटीची होईल अशी कुस्तीप्रेमींची अपेक्षा होती. पण सामना सुरु झाल्यानंतर अवघ्या 2 मिनिटाच्या आतच शिवराज राक्षेने महेंद्र गायकवाडला आस्मान दाखवत चीतपट केलं आणि महाराष्ट्र केसरी होण्याचा मान पटकावला.