Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

माधुरी - शर्मिलीमुळे ताडोबाच्या 'बफरझोन'ला पर्यटकांची पसंती!

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचा कोअर एरिया म्हणजे वाघांचं नंदनवन.. त्यामुळे या भागाला पर्यटक अधिक पसंती देतात.. मात्र, सध्या पर्यटकांनी कोअर एरियाऐवजी 'बफरझोन'कडे आपला मोर्चा वळवलाय. 

माधुरी - शर्मिलीमुळे ताडोबाच्या 'बफरझोन'ला पर्यटकांची पसंती!

आशिष अम्बाडे, झी मीडिया, चंद्रपूर : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचा कोअर एरिया म्हणजे वाघांचं नंदनवन.. त्यामुळे या भागाला पर्यटक अधिक पसंती देतात.. मात्र, सध्या पर्यटकांनी कोअर एरियाऐवजी 'बफरझोन'कडे आपला मोर्चा वळवलाय. 

जंगलाचा 'बफरझोन' म्हणजे पर्यटकांचा तसा दुर्लक्षित भाग... या भागात क्वचितच व्याघ्रदर्शन घडतं. मात्र, सध्या पर्यटकांनी आपला मोर्चा ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफरझोनकडे वळवलाय... त्याला कारण आहे माधुरी आणि शर्मिली... 

ताडोबातल्या या दोन वाघीणी व्याल्यात... यातल्या शर्मिलीला तीन बछडे आहेत तर माधुरीला चार... या दोनही वाघिणी सध्या ताडोबाच्या बफरझोनमध्ये वावरताहेत. त्यामुळे एरव्ही व्याघ्र दर्शनासाठी कोअर एरिया पालथा घालणारे पर्यटक आता बफरझोनलाच अधिक पसंती देऊ लागलेत.

जय वाघाचं अचानक गायब होणं, गेल्या काही दिवसांपासून वाघांच्या मृत्यूच्या घटना वाढणं, यामुळे वनविभाग आणि ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पावर अवकळा पसरली होती. मात्र, माधुरी आणि शर्मिली या दोन लोकुरवाळ्या वाघिणी आणि त्यांच्या पिलावळीच्या आगमनानं व्याघ्रप्रकल्प पुन्हा श्रीमंत झालाय. आता गरज आहे ती निसर्गाच्या या सौंदर्यंच्या रक्षणाची...

Read More