Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

सपा-बसपाच्या निर्णयाचा काँग्रेसला महाराष्ट्रात फटका बसणार?

'राज्यात निवडणुका लढवूच नका, असा काँग्रेसचा आग्रह होता. मात्र तो मान्य करणं शक्य नव्हतं'

सपा-बसपाच्या निर्णयाचा काँग्रेसला महाराष्ट्रात फटका बसणार?

मुंबई : काँग्रेसबरोबर बोलणी फिसकटल्यानंतर सपा - बसपाने महाराष्ट्रात युती करत सर्व ४८ जागा लढवण्याचा निर्णय जाहीर केलाय. त्यामुळे काँग्रेसची डोकेदुखी वाढलीय. समाजवादी पक्षानं राज्यात काँग्रेसकडे एक जागा मागितली होती. पण काँग्रेसनं त्याची तयारी दाखवली नाही. अखेर समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षानं राज्यातही एकत्र येत सर्व ४८ जागा लढण्याचा निर्णय घेतलाय. बहुजन वंचित आघाडी पाठोपाठ सपा बसपानेही स्वतंत्र लढण्याचा निर्णय जाहीर केल्याने काँग्रेसला मतविभाजनाचा मोठ्या प्रमाणात फटका बसण्याची चिन्हं आहेत. 'राज्यात निवडणुका लढवूच नका' असा काँग्रेसचा आग्रह होता, मात्र तो मान्य करणं शक्य नव्हतं, असं समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी स्पष्ट केलं. उत्तर प्रदेशात सपा-बसपा आघाडीनं अमेठी आणि रायबरेली या जागांवर उमेदवार उभे न करण्याचा निर्णय घेतलाय. त्याच न्यायानं राज्यात काही जागा सपा बसपाला मिळणं गरजेचं होतं, असं आझमी यांनी म्हटलंय.  

सपा बसपा युतीने ४८ जागी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पारंपरिक मतदार असलेला मुस्लिम समाज काँग्रेसपासून दुरावण्याची चिन्हं आहेत. राज्याची लोकसंख्या ११.२४ कोटी आहे. त्यापैंकी १.३ कोटी मुस्लिम समाज आहे. राज्यात जवळपास १३ मतदारसंघात याचा फटका बसण्याची शक्यता आहे. 

मुंबईतल्या ६ मतदारसंघात १८ टक्के मुस्लिम मतदार आहेत. धुळ्यात २४ टक्के, नांदेडमध्ये १७ टक्के, परभणी १६ टक्के, लातूर १५ टक्के, ठाण्यात १५ टक्के, अकोला १९ टक्के, औरंगाबाद २० टक्के मुस्लिम मतदार आहेत. 

सपा-बसपाचे जागावाटप आणि उमेदारांच्या नावांवर चर्चा सुरू आहे. पाच एप्रिलला नागपुरात बसपा नेत्या मायावतींची सभा होतेय. या सभेला समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादवही उपस्थित राहण्याची शक्यता आहे. वंचित बहुजन आघाडीपाठोपाठ सपा-बसपानंही काँग्रेसच्या पायात पाय घालण्याचा प्रयत्न केलाय, हे मात्र नक्की.  

Read More