Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

'मोदींनी राज्यात प्रचार केलेल्या 18 पैकी 14 जागांवर भाजप पराभूत'; ठाकरे म्हणतात, 'मोदींशी शत्रुत्व फायद्याचं'

Fighting Against Modi Is More Useful:  "मोदी नागपुरात गेले नाहीत. तेथे भाजपचे नितीन गडकरी विजयी झाले," असा चिमटाही ठाकरे गटाने काढला असून सध्या एनडीएमध्ये असलेल्या अनेक राजकीय पक्षांना इशारा दिला आहे.

'मोदींनी राज्यात प्रचार केलेल्या 18 पैकी 14 जागांवर भाजप पराभूत'; ठाकरे म्हणतात, 'मोदींशी शत्रुत्व फायद्याचं'
Updated: Jun 06, 2024, 09:06 AM IST

Fighting Against Modi Is More Useful: लोकसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील प्रमुख घटक पक्ष असलेल्या भारतीय जनता पार्टीने 400 पारचा नारा दिला होता. मात्र त्यांना 300 चा टप्पाही गाठता आलेला नाही. याच मुद्द्यावरुन आता उद्धव ठाकरे गटाने भाजपावर निशाणा साधला आहे. महाराष्ट्रातील निकालांचा संदर्भ देत पंतप्रधान मोदींनी सभा घेतलेल्या 18 पैकी 14 जागांवर भाजपाचा पराभव झाल्याची आकडेवारी सांगत ठाकरे गटाने 'सामना'मधून टीकास्त्र सोडलं आहे.

मोदी जिथे गेले तिथे 14 जागांवर पराभव

"भारतीय जनता पक्षाला मिळालेल्या 240 जागा हा ‘मोदी’ ब्रॅण्डचा चमत्कार नाही. राज्याराज्यांतील प्रादेशिक पक्षांच्या मदतीने भाजपने हा आकडा गाठला. मोदी यांनी महाराष्ट्रात 18 सभा व अनेक रोड शो केले. 18 पैकी 14 जागांवर भाजपचा पराभव झाला," असा टोला ठाकरे गटाने लगावला आहे. तसेच पुढे बोलताना, "मोदी नागपुरात गेले नाहीत. तेथे भाजपचे नितीन गडकरी विजयी झाले," असा चिमटाही ठाकरे गटाने काढला आहे.

मोदींशी शत्रुत्व फायद्याचे

"भारतीय जनता पक्षाचा ‘आरोप’ होता की, महाराष्ट्रात मोदींचा फोटो लावून शिवसेनेचे खासदार जिंकले. भाजपचा हा भ्रम या वेळी लोकांनी तोडला," असं ठाकरे गटाने म्हटलं आहे. "उद्धव ठाकरे यांचा चेहरा घेऊन शिवसेनेचे नऊ खासदार जिंकले व शरद पवारांचा चेहरा घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे आठ खासदार विजयी झाले. उलट महाराष्ट्रात ‘मोदी मोदी’ करणाऱ्यांचा आकडा 23 वरून 9 वर आला. महाविकास आघाडीने 30 जागा जिंकल्या त्या मोदींशिवाय. मोदी वगैरे लोकांशी मैत्री ठेवण्यापेक्षा त्यांच्याशी शत्रुत्व केले तर ते फायद्याचे ठरते," असं म्हणत ठाकरे गटाने टीका केली आहे.

नक्की वाचा >> 'मला सरकारमधून मोकळं करा!' लोकसभेतील पराभवानंतर फडणवीसांचे राजीनाम्याचे संकेत

सावध राहिले पाहिजे

"मोदी व त्यांचा मतलबी पक्ष त्यांना संकटात साथ देणाऱ्या मित्रांनाच संपवून टाकतो हा अनुभव आहे. त्यामुळे चंद्राबाबू नायडू यांनी अत्यंत सावध राहिले पाहिजे. बाबूंचे बोट धरून भाजप आंध्रात घुसला आहे. बाबूंना संपवायचा प्लॅन त्यांच्या डोक्यात घोळतच असेल. नवीन पटनायक यांच्या बिजू जनता दलाने दहा वर्षे दिल्लीत मोदी यांच्या सरकारला बिनशर्त पाठिंबा दिला. दहा वर्षांनी ओडिशातून नवीन पटनायक व बिजू जनता दलास भाजपने संपवून टाकले. पटनायक हे आता वनवासातच गेले. देशभरात भाजपने हेच आणि हेच केले," असं ठाकरे गटाने म्हटलं आहे.

नक्की वाचा >> 'वाराणसीत जिंकताना दमछाक झाली', राऊतांचा मोदींना टोला; म्हणाले, 'तुमच्यापेक्षा अमित शाहांना...'

वापर करुन घेतील म्हणत टीका

"भाजप हा मिठाला व शब्दाला जागणारा पक्ष नाही आणि मोदी हे त्याबाबतीत प्रख्यात आहेत. मोदी यांचे भारतीय सभ्यता व संस्कृतीशी नाते नाही हे चंद्राबाबू वगैरे लोकांना माहीत आहेच, पण बाबू यांनीही राजकारणात अनेक उन्हाळे-पावसाळे पाहिले आहेत. त्यामुळे भारतीय सभ्यता व लोकशाहीला इजा पोहोचेल असे कृत्य ते करणार नाहीत. मोदी यांना तिसऱ्यांदा शपथ घ्यायची आहे म्हणून ते नितीश कुमार व चंद्राबाबूंचा वापर करतील, पण ही तिसरी ‘कसम’ म्हणजे मोदी-भाजपच्या अंकाचा चौथा अंक ठरेल. पडद्यामागची नवी पटकथा घडताना देश पाहत आहे," असं लेखाच्या शेवटी म्हटलं आहे.