Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

'मविआ'ने 31 जागा जिंकल्या! BJP नेता घेणार राजकीय संन्यास? म्हणालेला, 'ठाकरे तुम्ही मर्दांचा..'

Lok Sabha Election 2024 Results MVA Huge Sucess: महाराष्ट्रामध्ये लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने अभूतपूर्व यश संपादन केलं आहे. तर दुसरीकडे भाजपाला खासदारांचा दुहेरी आकडाही गाठता आलेला नाही.

'मविआ'ने 31 जागा जिंकल्या! BJP नेता घेणार राजकीय संन्यास? म्हणालेला, 'ठाकरे तुम्ही मर्दांचा..'
Updated: Jun 05, 2024, 01:59 PM IST

Lok Sabha Election 2024 Results MVA Huge Sucess: लोकसभा निवडणूक 2024 चे निकाल मंगळवारी (5 जून 2024) जाहीर झाले. या निवडणुकीमध्ये भारताबरोबरच देशातील दोन मोठ्या राज्यांमधील निकाल हे भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीला फटका बसला आहे. एकीकडे भाजपाकडून सुरुवातीपासूनच 400 पारचं कॅम्पेन चालवण्यात आलं. मात्र एनडीएला 292 जागांपर्यंत मजल मारता आली. तर दुसरीकडे 100 च्या आसपास जागा दाखवण्यात आलेल्या इंडिया आघाडीने मोठी झेप घेत 234 जागा मिळवल्या. 

चर्चा आशिष शेलारांच्या संन्यासाची

महाराष्ट्रातील निकालाबद्दल सांगायचं झालं तर राज्यातही महायुतीला मोठा फटका बसला. महायुतीच्या कोणथ्याही पक्षाला विजयी जागांचा दुहेरी आकडा गाठता आला नाही. मात्र दुसरीकडे महाविकास आघाडीने 31 जागांवर विजय मिळवला. महाविकास आघाडीने मिळवलेल्या या यशानंतर आता भाजपाचे आमदार आशिष शेलार यांच्या राजकीय संन्यासाची चर्चा सुरु झाली आहे. यामागील मुख्य कारण म्हणजे निवडणुकीआधी आशिष शेलार यांनी प्रसारमाध्यमांशी चर्चा करताना केलेला एक दावा. सध्या आशिष शेलार यांच्या या विधानाचा व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे. 

काय म्हणालेले शेलार?

लोकसभा निकालाच्या साधारण महिन्याभरापूर्वी प्रसारमाध्यमांशी बोलताना आशिष शेलार यांनी एक विधान केलं होतं. "हे रेकॉर्डींग करायचं वाक्य, उद्धव ठाकरेजी हा तुम्ही मर्दांचा पक्ष चालवत असाल. मर्द आणि मर्दांचं नेतृत्व करत असाल तर तुम्हाला माझं जाहीर आव्हान आहे. भारतीय जनता पार्टी देशात 45 च्या वर गेली तर उद्धव ठाकरेजी तुम्ही राजकारण सोडाल. मी तुम्हाला प्रतीआव्हान देतो, देशात जाऊ दे. महाराष्ट्रात गेल्यावेळी तुम्ही 18 होतात आमच्यामुळे. आता महाविकास आघाडी म्हणून जरी तुम्ही 18 आलात तर मी राजकारण सोडेल," असं आशिष शेलार म्हणाले होते.

नक्की वाचा >> 'आई तिच्या पक्षासाठी..', सुनेत्रा पवारांच्या पराभवानंतर पार्थची पोस्ट; लोक म्हणाले, 'आजोबांकडे..'

काँग्रेसने करुन दिली आव्हानाची आठवण 

काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी निकालानंतर आशिष शेलारांचा हा व्हिडीओ शेअर करत त्यांना या आव्हानाची आठवण करुन दिली आहे. "आशिष शेलारजी शब्दाचे पक्के आहेत. त्यामुळे त्यांनी राजकारण सोडल्यावर दुःख नक्कीच होईल. पुढील वाटचालीसाठी आगाऊ शुभेच्छा," अशी खोचक कॅप्शन सचिन सावंत यांनी या व्हिडीओला दिली आहे.

वडेट्टीवार यांनीही साधला निशाणा

"लोकसभेचा निकाल म्हणजे आमच्या एकीचा विजय आहे. शरद पवारांनी बाप बाप असतो हे दाखवून दिलं. राहुल गांधींच्या अथक प्रयत्नांनी हे यश मिळालं आहे. जिथे जिथे राहुल गांधींनी यात्रा केली तिथे आम्ही यशस्वी झालो, असं काँग्रेसचे महाराष्ट्रातील नेते तसेच विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे. तसेच पुढे बोलताना, "आशिष शेलार राजकीय संन्यास घेऊन दिलेल्या शब्दाला जागतात का हे बघूयात," असा खोचक टोलाही वडेट्टीवार यांनी लगावला आहे.