Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

अमित शाह यांची गडचिरोली-चंद्रपूरमधली सभा शेवटच्या क्षणी रद्द

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांची गडचिरोलीमधली सभा शेवटच्या क्षणी रद्द करण्यात आली आहे.

अमित शाह यांची गडचिरोली-चंद्रपूरमधली सभा शेवटच्या क्षणी रद्द

गडचिरोली : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांची गडचिरोलीमधली सभा शेवटच्या क्षणी रद्द करण्यात आली आहे. अमित शाह यांची सभा रद्द होण्याचं कारण अजूनही स्पष्ट झालेलं नाही. अमित शाह यांची सभा रद्द झाल्यानंतर राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचं भाषण झालं. अमित शाह यांच्या विमानात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे त्यांचं विमान नागपूरला येऊ शकलं नाही. नागपूरवरून अमित शाह हे हेलिकॉप्टरने गडचिरोलीला येणार होते.

गडचिरोलीमध्ये बड्या नेत्याची ही पहिलीच सभा होती. कोणत्याही मोठ्या नेत्याने अजून गडचिरोलीमध्ये सभा घेतलेली नव्हती. पण भाजपने अमित शाह यांची सभा आयोजित केली होती, पण ऐनवेळी ही सभा रद्द करण्यात आली. अमित शाहंच्या सभेसाठी गडचिरोलीच्या आदिवासी भागतून लोकं आली होती. शेवटच्या क्षणी सभा रद्द झाल्यामुळे भाजपचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांचा हिरमोड झाला. अखेर सुधीर मुनगंटीवार यांचं प्रमुख भाषण झाल्यानंतर ही सभा संपवण्यात आली.

गडचिरोलीनंतर चंद्रपूरमधलीही अमित शाह यांची संध्याकाळी होणारी सभा रद्द करण्यात आली. नक्षलग्रस्त भाग असल्यामुळे पोलिसांनी गडचिरोलीमध्ये चोख तयारी केली होती. सभेसाठी कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

एकीकडे अमित शाह यांच्या विमानात तांत्रिक बिघाड झाल्याचं कारण सुधीर मुनगंटीवार यांनी दिलं असलं तरी अमित शहा यांची तब्येत बिघडल्याने ते या सभांना येऊ शकले नाहीत अशी माहिती आहे.

गडचिरोली आणि चंद्रपूरसह विदर्भात ११ एप्रिलला मतदान होतंय. त्याआधीचा प्रचाराचा आजचा शेवटचा रविवार आहे. भाजपाच्या बड्या नेत्याची ही एकमेव सभा होणार होती. भाजपकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वर्धा आणि गोंदियामध्ये दोन सभा झाल्या होत्या. मागच्या लोकसभा निवडणुकीत भाजपने विदर्भातल्या सगळ्या १० जागांवर विजय मिळवला होता. यावेळीही अशीच कामगिरी करण्यासाठी मोदी आणि शाह विदर्भात सभा घेणार होते. पण अमित शाह यांची सभा शेवटच्या क्षणी रद्द झाली. 

Read More