Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

LIVE UPDATE: मराठा आंदोलन : दोन जणांचा आत्महत्येचा प्रयत्न

संपूर्ण अपडेट एकाखाली एक दिले आहेत, स्क्रोल करत राहा..

LIVE UPDATE: मराठा आंदोलन : दोन जणांचा आत्महत्येचा प्रयत्न

बीड : (अपडेट दुपारी ३ वाजता ) गेवराई दोन आंदोलकांनी आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. या दोन तरूणांनी तहसिल कार्यालयावर चढून खाली उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. पण पोलिसांच्या वेळीच हे लक्षात आल्याने पोलिसांनी या आंदोलकांना ताब्यात घेतलं आहे. आता परिस्थिती नियंत्रणात आहे. (खाली पाहा बातमीचा व्हिडिओ)

मराठा आरक्षण मागणीसाठी काकासाहेब शिंदे या तरूणाचा गोदावरीत बुडून मृत्यू झाल्यानंतर आज आंदोलकांनी बंद पुकारला आहे. हे आंदोलन अधिक प्रक्षोभक होत असल्याचं दिसून येत आहे.

गेवराईत देखील आतापर्यंत एसटी बसच्या ४६१ फेऱ्या बंद ठेवण्यात आल्या आहेत, एसटीची तोडफोड रोखण्यासाठी हा प्रयत्न आहे, पण एसटीवर दगडफेक करू नका, असं विविध मराठा संघटनांनी बजावलं आहे. गेवराईत व्यापाऱ्यांकडून बाजारपेठा बंद ठेवून बंदला पाठिंबा देण्यात आला आहे.

मराठा आंदोलन : जमाव चालून आल्याने पळताना पोलिसाचा हार्ट अटॅकने मृत्यू

औरंगाबाद : (अपडेट 02.30 दुपारी) मराठा आंदोलनाला हिंसक वळण लागलं आहे. आंदोलना दरम्यान पोलिसांवर जमाव चालून आल्याने पळताना पोलीस कॉन्स्टेबलचा हृद्यविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. लक्ष्मण पाटगावकर असं पोलीस कॉन्स्टेबलांचं नाव आहे. औरंगाबादमध्ये त्यांना रुग्णालयात तात्काळ दाखल करण्यात आलं पण त्याआधीच त्यांचा मृत्यू झाल्याची डॉक्टरांनी माहिती दिली. या दरम्यान पळत असताना आणखी एक पोलीस खाली पडल्याने जखमी झाले आहेत.(खाली पाहा बातमीचा व्हिडिओ)

औरंगाबाद : (अपडेट 02.14 दुपारी)  कोयगावमधील प्रक्षोभक जमाव आता नियंत्रणात आला आहे, कारण मोठ्या प्रमाणात पोलिसांनी फौजफाटा या ठिकाणी दाखल केला आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी लाऊड स्पिकरवर कायदा हातात घेऊ नका, हिंसा किंवा जाळपोळ केल्याने आरक्षण मिळणार नसल्याचं सांगितलं. प्रक्षोभक जमावाला आपली भूमिका पटवण्यास पोलीस दल यशस्वी झाल्याने, कायगाव येथील प्रक्षोभक जमाव नियंत्रणात आल्याचं म्हटलं जात आहे. (पाहा खालील व्हिडीओत)

या दोन खासदारांनी संसदेत खणखणीत मराठीत सांगितलं आरक्षण द्या

नवी दिल्ली : (अपडेट 01.50 दुपारी) शिवसेनेचे खासदार विनायक राऊत आणि राष्ट्रवादीचे खासदार धनंजय महाडीक यांनी आज मराठा आणि धनगर आरक्षणाचा मुद्दा खणखणीत मराठीत संसदेत मांडला, यापूर्वी मराठा आरक्षणाची मागणी किती शांतपणे सुरू होती. मराठा समाजात बहुतांश शेतकरी आहेत, तेव्हा त्यांची परिस्थिती बिकट असल्याने त्यांना आरक्षण देण्यात यावं अशी मागणी या खासदारांनी लावून धरली. लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी देखील ही मागणी शांतपणे ऐकून घेतली. (पाहा खालील व्हिडीओत त्यांनी काय मागणी केली)

मराठवाड्यातील आंदोलनाची धग पाहा या खालील व्हिडीओत

औरंगाबाद : (अपडेट 1.40 दुपारी) मराठा आरक्षणासाठी आज पुकारलेल्या बंद आंदोलनाला, आज मराठवाड्यातून जोरदार प्रतिसाद मिळत आहे, मराठवाड्यातील सर्व आगारांच्या एसटी बस बंद आहेत, शाळा आणि महाविद्यालयं बंद आहेत, विद्यार्थ्यांनी बंदला प्रतिसाद म्हणून उस्फूर्त रॅली काढल्या आहेत. एकही एसटीवर दगडफेक करू नका असं आवाहन विविध मराठा संघटनांकडून करण्यात आलं आहे. खालील व्हिडीओत पाहा, मराठवाड्यात कुठे कुठे कसं बंद आंदोलन सुरू आहे.

एकनाथ खडसे म्हणतात तात्काळ आरक्षण देता येईल

अहमदनगर : (01.27 दुपारी) मराठा समाजाला तात्काळ आरक्षण दिलं पाहिजे, असं भाजप नेते एकनाथ खडसे यांनी बीडमध्ये म्हटलं आहे, मराठा आंदोलन अधिक तीव्र झाल्यानंतर एकनाथ खडसे यांनी  पाथर्डीमध्ये ही प्रतिक्रिया दिली आहे.

चंद्रकांत पाटील यांनी जरी, मराठा आरक्षण हे न्यायप्रविष्ठ असलं तरी, मराठा आरक्षण तातडीने देण्याची गरज असल्याचं म्हटलं आहे. तरी मागासवर्गीय आयोगाचा अहवाल आणि न्यायालयाच्या निर्णयाला अधीन राहून, मराठा आरक्षण तात्काळ लागू केलं पाहिजे, असं एकनाथ खडसे यांनी पाथर्डी येथे म्हटलं आहे...

आरक्षणासाठीचं बंद आंदोलन मागे घेण्याची मागणी

सांगली : (अपडेट 1.15 दुपारी) मराठा संघटनांनी पुकारलेलं महाराष्ट्र आंदोलन मागे घ्यावं, असं आवाहन महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलंय. आंदोलनात समाजकंटकांचा शिरकाव झालाय, तसंच मराठा आरक्षणाचा मुद्दा न्यायप्रविष्ट आहे. त्यामुळे हे आंदोलन मागे घ्यावं, असं आवाहन चंद्रकांत पाटील यांनी केलंय.

औरंगाबाद - कोयगावमध्ये जमाव हिंसक, अग्निशमन दलाची गाडी पेटवली

औरंगाबाद : (अपडेट 1.00 दुपारी) औंरंगाबादमध्ये मोर्चाला हिंसक वळण लागलं आहे, जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रू धुरांचा वापर करावा लागतोय. कायगाव नाक्याजवळ अग्निशमन दलाची गाडी पेटवली आहे. पोलिसांनी प्रक्षोभक जमावावर अश्रू धुराच्या नळकांड्या फोडल्या आहेत, पोलिसांना या ठिकाणाहून जागा सोडावी लागली, पण पुन्हा स्वत: एसपी मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौज फाटा घेऊन आले आहेत.

शिवसेनेचा मराठा आंदोलनाला पाठिंबा, पाहा काय म्हणताय खासदार आढळराव पाटील

>

- हिंगोली जिल्ह्यात कडकडीत बंद, शाळा महाविद्यालय, बस, बाजरापेठा बंद. काकासाहेब शिंदे यांना जागोजागी श्रद्धांजली

- सांगली : 'मराठा आंदोलनात समाज कंटक घुसलेत. त्यामुळे मराठा आंदोलन बदनाम करत आहेत. आरक्षण देणे सरकारच्या हातात नाही, न्यायालयाने याबाबत निर्णय घ्यायचा आहे. आंदोलन करून, बसेस जाळून आरक्षण मिळणार नाही, मराठा आंदोलकानी आंदोलन मागे घ्यावे. मराठा आरक्षणाबाबत सरकार, मुख्यमंत्री चर्चेला तयार आहेत' - चंद्रकांत पाटील

- परभणी: आंदोलकांनी सचखंड एक्स्प्रेससह 4 रेल्वे गाड्या अडवल्या, रेल्वे पोलिसांच्या मध्यस्तीनंतर रेल्वे पूर्वपदावर

- सातारा : मराठा समाजाचे कराड तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.

- मराठा समाजाचा संगमनेर प्रांत कार्यालयावर मोर्चा, हातात काळे झेंडे घेवून निषेध

- जालना जिल्ह्यात सर्वत्र कडकडीत बंद. शाळा,महाविद्यालये देखील बंद, दुकाने बंद ठेवून बंदमध्ये व्यापाऱ्यांचा सहभाग.

- सोलापूरात व्यवहार सूरळीत, बंदचा प्रभाव नाही

- नांदेड जिल्ह्यात कडकडीत बंद, तालुक्यांसह शहरातील सर्व दुकाने बंद, मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते रस्त्यावर

- शिर्डीत मराठा समाजाचा अहमदनगर-मनमाड रोडवर रास्तारोको

- परभणी: मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बससेवा बंद

- बदलापूर : शहरातील बाजार पेठ बंद. मराठा समाजाच्या कार्यकत्यांनी केल्या बाजारपेठा बंद ,

- परभणी जिल्ह्यातील अनेक शाळा, महाविद्यालयांना सुट्टी. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून उपाययोजना

- मराठा क्रांती मोर्च्याच्यावतीने नांदगांव - वेहळगाव रस्त्यावर साकोरा येथे रास्तारोको, टायर जाळून केला शासनाचा निषेध

- उस्मानाबाद : मराठा आंदोलनला मोठा प्रतिसाद. दुकाने आणि शाळा बंद. एसटी बसेस ही बंद

- नगर जिल्ह्यातही बंदला प्रतिसाद, अनेक गावात बंदला चांगला प्रतिसाद

- लातूर - मराठा आंदोलनाचा प्रवाशांना फटका, पंढरपूरला जाणारे नांदेड जिल्ह्यातील हदगाव येथील १७ प्रवासी लातूरमध्ये अडकले. एसटीकडून कोणतीही व्यवस्था नसल्यामुळे प्रवासी नाराज. तिकिटाचे पैसेही परत करण्यास ही एसटी कर्मचाऱ्यांचा नकार.

- जालना: जालना जिल्ह्यात बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद.

Read More