Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

पबजी खेळू न दिल्याने लहान भावाकडून मोठ्याचा भावाचा खून

पबजी खेळू न दिल्याने लहान भावाने मोठ्या भावाचा खून केल्याची घटना भिवंडीत घडली आहे. मोहंमद फहादने आपल्या मोठ्या भावावर कात्रीने वार करून त्याचा खून केला आहे. 

पबजी खेळू न दिल्याने लहान भावाकडून मोठ्याचा भावाचा खून

कपिल राऊत, झी मीडिया, भिवंडी : पबजी खेळू न दिल्याने लहान भावाने मोठ्या भावाचा खून केल्याची घटना भिवंडीत घडली आहे. मोहंमद फहादने आपल्या मोठ्या भावावर कात्रीने वार करून त्याचा खून केला आहे. आरोपी हा १५ वर्षांचा आहे. या घटनेनंतर या कुटूंबाला मोठा धक्का बसला आहे.

भिवंडी शांती नगरच्या चव्हाण कॉलनीत शाह परिवार राहतं. या कुटूंबातील लहान मुलगा मोहंमद फहादला पबजी खेळण्याचं व्यसन होतं. कारण दिवसरात्र तो पबजी खेळत होता. यामुळे घरातील सर्व सदस्य चिंतेत होते.

मोहंमद फहाद हा काल रात्री आईच्या मोबाईलवर पबजी खेळत होता, मोठा भाऊ मोहंमद हुसेनने त्याला रोखलं. फहादच्या जो लहान भाऊ आहे, त्याच्या हातातून हुसेनने मोबाईल घेतला. फहादला याचाच राग आला. यावरून भावाभावात भांडण सुरू झालं. यानंतर मारामारी सुरू झाली.

मोबाईल हिसकावला म्हणून फहादला आपला अपमान झाल्यासारखं वाटत होतं. त्याचा राग अनावर झाला आणि त्याने मोठा भाऊ हुसेनवर कात्रीने वार करण्यास सुरूवात केली. मोठा भाऊ हुसेन बेशुद्ध होईपर्यंत फहाद त्याच्यावर वार करत राहिला.

हुसेनला कुटुंबियांनी त्याला उपचारासाठी इंदिरा गांधी दवाखान्यात दाखल केलं, पण डॉक्टरांनी सांगितलं की, हॉस्पिटलमध्ये येण्याआधीच त्याचा मृत्यू झाला आहे.

शांतीनगर पोलीस स्टेशनच्या सिनीअर पीआय ममता डिसोझा यांनी याविषयी माहिती देताना सांगितलं, मोहंमद फहादच्या हातातून मोबाईल हिसकावल्याने, त्याचा राग अनावर झाला. पबजी खेळताना, त्याला थांबवल्याने त्याचा राग उफाळून आला. यामुळे त्याच्या हातातून मोबाईल हिसकावला गेला, तेव्हा तो आपला राग नियंत्रित नाही करू शकला.

शांतीनगर पोलिसांनी मोहंमद फहादला अटक केली आहे. फहाद हा बाल गुन्हेगार आहे, त्याला कोर्टासमोर सादर केल्यानंतर, बाल सुधारगृहात त्याची रवानगी होणार आहे.

Read More