Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

आयफोनसाठी MPSC विद्यार्थ्याचा खून, मारेकरी निघाले घरातलेच... धक्कादायक घटनेने कोल्हापूर हादरलं

कागल तालुक्यातील बामणी गावच्या हद्दीत एका उच्चशिक्षित तरुणाचा खून झाल्याने एकच खळबळ उडाली होती. कोणताही पुरावा नसताना पोलिसांनी अवघ्या चोवीस तासात 2 जणांना अटक केली.

आयफोनसाठी MPSC विद्यार्थ्याचा खून, मारेकरी निघाले घरातलेच... धक्कादायक घटनेने कोल्हापूर हादरलं

प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर : कोल्हापूरमधल्या कागल तालुक्यात (Kolhapur, Kagal) एका उच्चशिक्षित तरुणाच्या हत्येने (Murder) खळबळ उडाली होती. हा तरुण एमपीएससीचा (MPSC) अभ्यास करत होता. पण त्यानंतर त्याने वकिलीचं शिक्षण सुरु केलं. अमरसिंह थोरात असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव असून तो बामणी गावाच्या हद्दीत त्याचा मृतदेह आढळला. याची माहिती पोलिसांनी (Police) देण्यात आली. उच्चशिक्षित असलेल्या अमरसिंहचं कोणाबरोबर वैर होतं का याचा पोलिसांनी तपास सुरु केला. पण पोलिसांच्या हाती कोणताच पुरावा लागत नव्हता. पण सखोल चौकशीत अमरसिंहाच्या हत्येचे आरोपी त्याच्या घरातलेच असल्याचं समोर आलं. 

काय आहे नेमकी घटना
थोरात कुटुंब हे मुळचं सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील गोटखिंडी गावचे रहिवासी. मृत अमरसिंह थोरात गेली दहा वर्ष पुण्यात एमपीएससीचा अभ्यास करत होता. पण त्याला यश येत नव्हतं. त्यानंतर त्याने कोल्हापूरात वकिलीचं शिक्षण सुरु केलं. पण यादरम्यान त्याला दारुचं व्यसन लागलं. यावरुन त्याचं घरात वडिल आणि भावाशी भांडणं होऊ लागली. रोजच्या भांडणाला घरातले सर्वच त्रस्त झाले होते.

घटनेच्या दिवशी अमरसिंहने आपल्या वडिलांकडे आयफोन (iPhone) घेण्यासाठी दीड लाख रुपयांची मागणी केली. पण वडिलांनी नकार दिल्याने त्यांच्यात वाद सुरु झाला रागाच्या भरात  वडील दत्ताजीराव थोरात यांनी अमरसिंहच्या डोक्यात लोखंडी पाईप मारला. यात अमरसिंह जबर जखमी झाला. प्रचंड रक्तस्त्रावामुळे अमरसिंहचा जागीच मृत्यू झाला. मुलाच्या मृत्यूने वडिल दत्ताजीराव घाबरले. त्यांनी दुसरा मुलगा अभिजीत थोरात याच्या मदतीने अमरसिंहचा मृतदेह रस्त्याच्या कडेला टाकला.

पोलिसांनी मिळाली माहिती
रस्त्याच्या कडेला रक्ताच्या थारोळ्यात तरुणाचा मृतदेह पडला असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मृतदेत ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी पाठवून दिला.  अमरसिंहची हत्या कोणी आणि का केली याचा तपास पोलिसांनी सुरु केली. सुरुवातीला पोलिसांनी अमरसिंह याचं कोणाशी वैर होतं का याचा तपास केला. पण असा कोणताही पुरावा पोलिसांना सापडला नाही. त्यामुळे संशयाची सूई अमरसिंहच्या कुटुंबियांकडे वळली. 

पोलिसांनी वडिल दत्ताजीराव आणि मुलगा अभिजीत थोरात यांच्याकडे केलेल्या चौकशीत ते घाबरले असल्याचं जाणवलं. कठोर चौकशी करतात आपणच अमरसिंहची हत्या केल्याचं त्यांनी कबूल केलं. पोलिसांनी आरोपी दत्ताजीराव थोरात आणि अभिजीत थोरात यांना अटक केली असून अधिक तपास सुरु आहे. 

Read More