Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

बीडच्या राजकारणात ट्विस्ट, पंकजा मुंडेंचं गणित चुकणार? लोकसभेसाठी ज्योती मेटेंनी कसली कंबर

Beed Lok Sabha Election : देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर देखील ज्योती मेटे (Jyoti Mete) आता लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी ठाम असल्याचं पहायला मिळतंय. त्यामुळे आता पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्या विजयाचं समीकरण बिघडणार का? असा सवाल विचारला जात आहे.

बीडच्या राजकारणात ट्विस्ट, पंकजा मुंडेंचं गणित चुकणार? लोकसभेसाठी ज्योती मेटेंनी कसली कंबर

Jyoti mete lok sabha candidate : बीड लोकसभा मतदारसंघाबाबत (Beed Lok Sabha Election) मोठी बातमी समोर येतेय. भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडेंविरोधात शिवसंग्रामच्या ज्योती मेटे लढण्याची शक्यता आहे. ज्योती मेटे (Jyoti Mete) या शिवसंग्रामचे दिवंगत नेते विनायक मेटे यांच्या पत्नी आहेत. ज्योती मेटेंनी शासकीय नोकरीचा राजीनामा देत राजकारणात सक्रीय होण्याचा निर्णय घेतलाय. मविआच्या माध्यमातून बीड लोकसभा निवडणुकीसाठी ज्योती मेटेंच्या नावाची चर्चा आहे. लोकसभा लढण्याबाबतची भूमिका ज्योती मेटे 29 मार्चला स्पष्ट करणार आहेत. मराठा आरक्षणासाठी योगदान दिलेल्या दिवंगत विनायक मेटेंबाबतची मराठा समाजाची सहानुभूती त्यांच्या पत्नी ज्योती मेटेंना मिळू शकते. त्यामुळे आता बीडमध्ये कोणाचं गणित चुकणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

तब्बल 18 लाखांहून अधिक मतदार संख्या असलेल्या बीड लोकसभा मतदारसंघात मराठा, ओबीसींमधला वंजारा समाज आणि धनगर समाज निर्णायक भूमिकेत असतो. तेव्हा ज्योती मेटे बीडमधून उभ्या राहिल्यास पंकजा मुंडेंना (Pankaja Munde) ही निवडणूक जड जाण्याची शक्यता आहे. भारतीय जनता पार्टीने पंकजा मुंडे यांना उमेदवारी जाहीर केली होती. अशातच आता ज्योती मेटे यांनी रणशिंग फुंकलं तर मराठा मतांचा नकारात्मक प्रभाव नक्कीच पंकजा मुंडे यांच्यावर पडणार आहे. महादेव जानकर यांना जागा दिल्यानंतर आता ज्योती मेटे यांना देखील तिकीट मिळेल, अशी शक्यता होती. त्यासाठी ज्योती मेटे यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांची सागर बंगल्यावर भेट देखील घेतली होती.

ज्योती मेटेंना बळ कोण देतंय?

गेल्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांचा पराभव झाला होता. त्यानंतर पंकजा मुंडे यांना राष्ट्रीय राजकारणात स्थान मिळालं. मात्र, त्या खुश नसल्याचं बोललं जात होतं. आता त्यांना पुन्हा तिकीट जाहीर झालं खरं पण पंकजा मुंडे यांचा गेम केला जातोय का? असा सवाल देखील विचारला जात आहे. तीन दिवसांपूर्वी पंकजा धाकटी पंढरी नावाने प्रसिद्ध असलेल्या श्रीश्रेत्र संस्था नारायणगडमधील श्रीनगर नारायण महाराजांचे दर्शन घेण्यासाठी गेल्या होत्या. दर्शन घेऊन पंकजा मुंडे गडावरुन खाली उतरताना साक्षाळ पिंपरी येथे मराठा बांधकांनी काळे झेंडे दाखवले होते. त्यामुळे आता पंकजा मुंडे यांचा पराभव करण्यासाठी ज्योती मेटे यांना बळ दिलं जातंय का? असा सवाल विचारला जातोय.

दरम्यान, पंकजांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर अजित पवार गटाचे नेते बजरंग सोनवणे यांनी शरद पवार गटात प्रवेश केला. बजरंग सोनवणे यांनी 2019 ला झालेल्या बीड लोकसभेत प्रीतम मुंडे यांच्या विरोधात निवडणूक लढवली. मात्र, सोनवणे यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते. प्रीतम मुंडे यांनी त्यांचा पराभव केला होता. आता बजरंग सोनवणे पुन्हा दोन हात करण्यासाठी तयार झाले आहेत.

Read More