Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

माणिकडोहात बोट उलटली, तीन जणांचा बुडून मृत्यू

मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात एनडीआरएफच्या जवानांना यश आलं

माणिकडोहात बोट उलटली, तीन जणांचा बुडून मृत्यू

हेमंत चापुडे, झी मीडिया, जुन्नर : जुन्नर तालुक्यातील माणिकडोह धरण परिसरात मासेमारी करत असताना अचानक बोट पाण्यात उलटल्याने दुर्दैवी घटना घडलीय. या अपघातात तीन मासेमारी करणारे आदिवासी तरुण पाण्यात बुडाले. वेळेवर मदत न मिळाल्याने तिघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच एनडीआरएफचे जवान घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात जवानांना यश आलंय.  

गणेश साबळे, स्वप्निल साबळे आणि पंढरीनाथ मुंढे अशी दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या आदिवासी तरुणांची नावे आहेत. माणिकडोह धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील केवाडी इथं मासे आणण्यासाठी निमगिरी व राजूर परिसरातील आठ जण होडीने जात होते. प्रमाणापेक्षा जास्त जण असल्यानं आणि भार सहन न झाल्याने होडी पाण्यात उलटली. त्यातील तीन जण पाण्यात बुडाले तर पाच जण पोहून किनाऱ्यावर येण्यात यशस्वी झाले

स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने बुडालेल्या तरुणांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना शोधकार्यात अपयश आल्याने पुण्यावरून 'एनडीआरएफ'च्या जवानांना पाचारण करण्यात आले. एनडीआरफ जवानांनी पाणबुडीच्या सहाय्याने शोध घेऊन अवघ्या दहा मिनिटांत मृतदेह बाहेर काढले. या घटनेने निमगिरी व राजूर गावांवर शोककळा पसरली आहे. 

Read More