Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

विधिमंडळाच्या लॉबीत सत्ताधारी आमदारांध्ये धक्काबुक्की; विरोधकांचा हल्लाबोल

विधिमंडळाच्या लॉबीत सत्ताधारी आमदारांची धक्काबुक्की महाराष्ट्राला लाज आणणारी असल्याची टीका नाना पटोले यांनी केली आहे.  भारतीय जनता पक्षाने सुरु केलेल्या राजकारणामुळे सभागृहाचा आखाडा  झाल्याचेही नाना पटोले म्हणाले. 

 विधिमंडळाच्या लॉबीत सत्ताधारी आमदारांध्ये धक्काबुक्की; विरोधकांचा हल्लाबोल

Maharashtra Assembly: महाराष्ट्र विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे मंत्री दादा भुसे व आमदार महेंद्र थोरवे यांच्यात विधिमंडळाच्या लॉबीत धक्काबुक्की झाली. महाराष्ट्राच्या विधिमंडळात असा प्रकार होणे चुकीचे आहे. भारतीय जनता पक्षाने सुरु केलेल्या राजकारणामुळे सभागृहाचा आखाडा झाला असून विधिमंडळाच्या लॉबीतच आमदारांनी एकमेकांना धक्काबुक्की, मारहाण करणे हे भूषणावह नाही तर महाराष्ट्राला लाज आणणारी घटना आहे, अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

आमदारांच्या धक्काबुक्की प्रकरणावर बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, सत्ताधारी आमदारांची जनतेच्या मुलभूत प्रश्नापेक्षा स्वतःच्या, वयैक्तिक प्रश्नांसाठी कुरघोडी चाललेली आहे. विधिमंडळाच्या लॉबीमध्ये मंत्र्यांवर खोक्यांचे आमदार तुटून पडतात हे खोक्याचे प्रकरण असून खोक्यामध्येच चालत राहणार, असे म्हणत या विधिमंडळात झालेल्या या घटनेचा तीव्र निषेध केला. आमदारांच्या धक्काबुक्कीचा मुद्दा विधान सभेतही उपस्थित करण्यात आला होता. धक्काबुक्कीची ही घटना बाहेर घडलेली नसून सभागृहाच्या लॉबितच घडलेली आहे, प्रकरण गंभीर असून तातडीने माहिती घेऊन यासंदर्भात योग्य ती कारवाई करावी असे नाना पटोले म्हणाले.  

प्रश्नोत्तराचा तास का नाही?

अधिवेशनात प्रश्नोत्तराचा तास हा सदस्यांसाठी महत्वाचे आयुध आहे परंतु या अधिवेशनात प्रश्नोत्तराचा तासच ठेवलेला नाही. आपल्या मतदारंसघातील प्रश्न, समस्या मांडण्यासाठी प्रश्नोत्तराचा तास असतो. सदस्यांचा तो अधिकार आहे. सदस्यांच्या अधिकाराचे रक्षण करण्याची अध्यक्षांची जबाबदारी आहे. कोविड काळात अधिवेशनाचा कालावधी कमी ठेवला होता परंतु आताही अधिवेशनात प्रश्नोत्तराचा तास ठेवण्यात आलेला नाही. सरकारने विधेयके मंजूर करून घेतली पण जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी सदस्यांना संधीच मिळाली नाही, असे नाना पटोले म्हणाले.

Read More